भुसावळ तालुक्यातील तीन गावांमध्ये एकाचवेळी चोरट्यांनी 11 घरे फोडली

तळवेलसह ओझरखेडा व पिंपळगावात बंद घरांना टार्गेट करीत लाखोंचा मुद्देमाल लंपास : ग्रामस्थांच्या गोटात प्रचंड घबराट


वरणगाव : शहरी भागात चोर्‍यांसह घरफोड्यांचा उच्छांद मांडणार्‍या चोरट्यांनी आपला मोर्चा वरणगाव परीसरातील ग्रामीण खेड्यांकडे वळवला आहे. भुसावळ तालुक्यातील तळवेलसह ओझरखेडा, पिंपळगाव या तीन खेड्यांमधील तब्बल 11 घरांमध्ये घरफोडी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली असून रोख रक्कमेसह सोन्याचा ऐवज मिळून लाखोंचा मुद्देमाल चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी मध्यरात्री दोन ते पहाटे चार दरम्यान अंतरा-अंतराने या चोर्‍या झाल्या आहेत. दरम्यान, तळवेल येथे चोर्‍यांचा प्रयत्न झाला असून अन्य ठिकाणी नऊ चोर्‍या झाल्याचा दावा पोलिस यंत्रणेने केला आहे.

चोरट्यांचे ठसे टिपले
सूत्रांच्या माहितीनुसार, तळवेलसह ओझरखेडा व पिंपळगाव येथे बंद घरांना चोरट्यांनी टार्गेट करीत मुद्देमाल लांबवल्याची बाब मंगळवारी पहाटे उघउकीस आल्यानंतर खळबळ उडाली. वरणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्यासह जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले व सहकार्‍यांनी पाहणी केली. दरम्यान, तीन ठिकाणी चोरट्यांचे ठसे टिपण्यात यंत्रणेला यश आले आहे तर चौकशीकामी सहा संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकींचा काही ग्रामस्थांना आवाज आल्याने चोरटे दुचाकीने आल्याचा कयास आहे. विशेष म्हणजे महामार्गापासून 15 किलोमीटर आतमध्ये तीनही गावे दोन ते चार किलोमीटर अंतरावर असून एका गावातून चोरी केल्यानंतर एकाच टोळीतील चोरट्यांनी हे काम केल्याचा संशय आहे.

वाहनाचा कट लागल्याचे निमित्त : तरुणाला मारहाण करीत कारच्या काचा फोडल्या

चोरट्यांची पोलिसांना जोरदार सलामी
सोमवारी मध्यरात्री दोन ते चार दरम्यान वरणगाव परीसरातील तळवेल येथे दोन, पिंपळगांव बुद्रुक येथे पाच व ओझरखेडे येथील चार अशा ठिकाणी चोरट्यांनी डाव साधला. विशेष म्हणजे घरफोडी झालेल्या घरातील कुटुंबील सदस्य गच्चीवर झोपले असताना चोरट्यांना आयतीच संधी मिळाली. तालुक्यातील पिंपळगांव बुद्रुक येथे आत्माराम कडू पाटील, रमेश लक्ष्मण पाटील, अनंता सीताराम सरोदे, अशोक मधूकर सरोदे, किसन शेनफडु बेंडाळे, ओझरखेडे येथे नचिकेत चावदस नेमाडे, अशोक चावदस नेमाडे (दोन्ही भाऊ), गोकुळ तुकाराम नेमाडे व उमराव पाटील यांच्याकडे घरफोडी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. नचिकेत नेमाडे यांच्या घरातून दोन लाखांची रोकड व 12 तोळे सोने सोन्याचा ऐवज मिळून पावणेपाच लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे सूत्रांनी सांगितले. तळवेल येथेही दोन ठिकाणी घरफोडी झाली मात्र चोरट्यांच्या हाती फार काही लागले नसल्याची माहिती आहे. चोरट्यांनी एकाचवेळी 11 ठिकाणी घरफोड्या करीत पोलिसांच्या गस्तीलाच आव्हान दिले आहे.

पोलिस यंत्रणेची घटनास्थळी पाहणी
घरफोड्यांच्या अनुषंगाने जळगाव येथून ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले मात्र श्वान घराभोवतीच घुटमळल्याने चोरटे दुचाकीने पसार झाल्याचा अंदाज आहे. पोलिसांची दोन पथके मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात रवाना करण्यात आली असून सहा संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांच्यासह वरणगावचे सहा.पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ, पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी, हवालदार प्रशांत ठाकूर, नागेंद्र तायडे, राहुल येवले आदींनी धाव घेतली.

शौकीन चोरट्यांना ‘बुटही’भावले
पिंपळगांव बुद्रुक येथील आत्माराम पाटील यांनी मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी 40 हजारांची जुळवा-जुळव केली होती तर किसन बेंडाळे यांच्या घरातून चोरट्यांनी काही रोख रक्कम व नव्यानेच आणलेला तीन हजार रुपये किंमतीचा बूट तसेच ताडपत्री असा ऐवज लांबवला. घरफोडीच्या या घटनेत चोरट्यांच्या हाती काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लागले तर काही ठिकाणी चोरट्यांना किरकोळ रक्कमेवर समाधान मानावे लागले. चोरी प्रकरणी मंगळवारी सायंकाळी किसन शेनफडू बेंडाळे (ह.मु.नागपूर) यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलि ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एरंडोलजवळ भीषण अपघात : ट्रेलरवर चारचाकी धडकून एक जागीच ठार










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !