भुसावळातील तरुणाच्या खून प्रकरणात दोन्ही आरोपी जाळ्यात
दारूच्या नशेत वाद उफाळल्याने खून : पोलिस अधीक्षकांची पत्रकार परीषदेत माहिती
भुसावळ : शहरातील रामदेव बाबा नगरातील रोहित दिलीप कोपरेकर (21) या तरुणाच्या खून प्रकरणी आरोपी सागर दगडू पाटील (22, भुसावळ) यास डोंबिवली येथून अटक करण्यात आल्यानंतर दुसरा पसार आरोपी राहुल राजेश नेहते (19, पाटीलमळा, भुसावळ) यास बुधवारी सकाळी बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. दरम्यान, भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी 24 तासात खुनाची गुन्ह्याची उकल केली असून मित्रांमध्ये पार्टी झाल्यानंतर वाद उफाळल्याने दोन्ही आरोपींनी रोहित कोपरेकर यास गळफास दिला व नंतर त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केली, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परीषदेत दिली. खुनाचा गुन्हा उघउकीस आणणार्या बाजारपेठ पोलिसांचे त्यांनी यावेळी कौतुक केले. यावेळी एलसीबी निरीक्षक किरणकुमार बकाले उपस्थित होते.
मित्रांमध्ये वाद उफाळल्याने केला खून
रोहित दिलीप कोपरेकर (21) या तरुणाचा खून करून मृतदेह वांजोळा रोडवरील गंगानगर पाठीमागील गोपाळ सावळे यांच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. मृतदेहाच्या कमरेवरील भागाचा केवळ सांगडा शिल्लक होता तर अंगावरील पँट व चप्पलेवरून पोलिसांनी मिसींग रजिस्टरच्या आधारे मयताची ओळख पटवली होती. पोलिसांनी सर्वदूर केलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या पाहणीत वांजोळा रोडवरील हॉटेल गब्बरमध्ये मयत व संशयीत पार्टी करताना आढळले होते शिवाय त्यांची ओळख निष्पन्न केल्यानंतर घटना उघडकीस आल्यानंतर संशयीत घरी आले नसल्याची माहिती उघड झाली व नशिराबाद टोल नाक्याजवळ दोन्ही आरोपी मयताची दुचाकी नेताना आढळल्याने त्यांच्यावर संशय बळावल्यानंतर एकाच्या डोंबिवलीतून तर दुसर्याच्या भुसावळातून मुसक्या आवळण्यात आल्या.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, सहाय्यक निरीक्षक सुदर्शन वाघमारे, हवालदार विजय नेरकर, किशोर महाजन, उमाकांत पाटील, निलेश चौधरी, तेजस पारीसकर, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार, सचिन पोळ, सचिन चौधरी, दिनेश कापडणे, योगेश माळी, जावेद शहा आदींच्या पथकाने आरोपींना अटक केली.
शिंदखेडा तहसीलचा लाचखोर अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात
