पाच दिवसांच्या गणरायाला उद्या यावल तालुक्यात निरोप
यावल : शहर व तालुक्यातील पाच गावातील पाचव्या दिवसाच्या बाप्पाला रविवारी निरोप दिला जाणार आहे. त्या दृष्टिकोनातून यावल पोलिसांच्या वतीने बंदोबस्त लावण्यात आला आहे तसेच यावल शहरातील विसर्जन मार्गावर बेहेडे सुपर शॉप जवळील मिरवणूक मार्गातील अडथळा दूर करून तेथील अतिक्रमण काढण्याचे कामदेखील पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
21 मंडळांतर्फे आज बाप्पांना निरोप
पाचव्या दिवसाच्या बाप्पाला यावल शहरातील 21 मंडळाच्या वतीने निरोप दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे नायगाव, कोरपावली, डांभुर्णी, दहिगाव व सावखेडासीम येथेदेखील पाचव्या दिवसाच्या बाप्पाला 15 मंडळांकडून निरोप दिला जाणार आहे. दुपारपासूनच विसर्जन मिरवणुका सुरू होतील.

मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण हटवले
यावल शहरात मेन रोडावर बेहेडे सुपर शॉप जवळ मिरवणुकीला अडथळा ठरणारे विविध प्रकारचे अतिक्रमण यात टेलिफोनचे खांब काही दुकानांच्या पायर्या आदी अतिक्रमण काढण्याचे काम शनिवारी पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. या ठिकाणी नगरपालिका प्रशासन आणि पोलीस स्टेशनच्या वतीने अतिक्रमण काढून विसर्जनाचा मार्ग मोकळा करण्यात आला. रविवारी दुपारी तीन वाजेपासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. शहर व तालुक्यातील गावातील पाचव्या दिवसाच्या बाप्पाला निर्विघ्न निरोप देता यावा यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
