होम लोन मंजुरीच्या आमिषाने पाचोर्यातील महिलेला 76 हजारांचा गंडा
76 thousand to a woman in Pachora with the lure of home loan approval पाचोरा : घरासाठीचे कर्ज मंजूर करून देण्याच्या आमिषाने पाचोर्यातील महिलेला 76 हजारांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी कासोद्यातील संशयीताविरोधात महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गृह कर्जाच्या आमिषाने केली फसवणूक
पाचोरा शहरातील गिरड रोडवरील भवानी नगर भागातील रहिवासी रेखा संजय पाटील (42) या महिला किराणा दुकान चालवून आपल्यासह परीवाराचा उदरनिर्वाह चालवतात. रेखा पाटील यांनी नवीन घर बांधण्यासाठी गृहकर्ज काढण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील धान्य मार्केट समोर राहणार्या कुणाल सुनील चौधरी याने रेखा पाटील यांची गृह कर्जाची फाइल मंजुर करून देतो, असे सांगून त्यांच्याकडून 18 मे 2022 ते 25 मे 2022 या कालावधीत टप्प्या-टप्प्याने ऑनलाइनच्या माध्यमातून तसेच 55 हजार रुपये रोख असे एकूण 75 हजार 900 रुपये घेतले. परंतू त्यानंतर रेखा पाटील यांनी वारंवार कुणाल चौधरी याच्याकडे गृह कर्जाच्या फाईलबद्दल चौकशी केली. पण कर्ज मिळत नसल्याने त्यांनी दिलेली रक्कम परत करावी, अशी मागणी केली. परंतु कुणाल चौधरी याने पैसे परत न दिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रेखा पाटील यांनी पाचोरा पोलिस ठाणे गाठून कुणाल चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

