नकली पोलिसांनी वृद्धाची अंगठी लांबवली : धरणगावातील घटना
Fake police give old man’s ring: incident in Dharangaon धरणगाव : वयोवृद्धाला थांबवत पोलिस असल्याची बतावणी करणार्या दोघा ठगांनी गंडवल्याची घटना शहरात भर दिवसा उड्डाणपुलाजवळ घडली. या प्रकरणी दोन अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोध
छगन सखाराम खैरनार (73, कमलनगर, एरंडोल, धरणगाव) यांच्या फिर्यादीनुसार, खैरनार हे 17 जानेवारी 10 वाजेच्या सुमारास घराचे लाईटबील भरण्यासाठी स्कुटीवरून शहरातील बालाजी पतपेढी येथे आले होते. लाईटबील भरल्यानंतर 11 वाजेच्या सुमारास स्कुटीने घरी परत जात असतांना शहरातील किकाभाई बोहरा यांच्या बंगल्यासमोर दोन अनोखी मोटारसायकलस्वार यांनी त्यांची दुचाकी थांबवली तसेच आम्ही पोलीस असल्याची बतावणी केली. भामट्यांनी खैरनार यांना विचारपुस केली की, तुमच्याकडे गांजा आहे काय?. यानंतर दोघं भामट्यांनी खैरनार यांच्या दुचाकीची डिक्की उघडण्यास सांगितले. यानंतर दोघा भामट्यांनी खैरनार यांच्या हातातील रुमाल व हातातील अंगठी खिशात घाला, असे सांगिीतले. घाबरून खैरनार यांनी हातातील अंगठी काढून खिशात घालण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान, भामट्यांनी हातचलाखीने अंगठी लंपास केली. यानंतर खैरनार यांच्या लक्षात येईपर्यंत दोघे भामटे मोटरसायकलने पसार झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.


