भुसावळात माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
नाहाटा महाविद्यालयातील मेळाव्यात 85 विद्यार्थ्यांचा सहभाग
भुसावळ : भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. त्यात 85 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत जुन्या आठवणींना उजाळा दिला. उद्घाटन महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी व इंग्रजी विषयात गोल्ड मेडलीस्ट प्रा.शिबा खान हिने केले. अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि माजी विद्यार्थी डॉ.मोहन फालक होते. प्रमुख पाहुणे म्हणून ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सचिव विष्णू चौधरी, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष आणि माजी विद्यार्थी संजयकुमार नाहाटा महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका शोभा तळेले यांची उपस्थिती होती. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रशांत पाटील व मेळावा समन्वयक डॉ.आशिष चौधरी हे उपस्थित होते.
मेळाव्यात सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार
या मेळाव्यात 2012 ते 2022 पर्यंत पदवी व पदव्युत्तर परीक्षा पास झालेले सुमारे 85 माजी विद्यार्थी सहभागी झाले. या सर्व माजी विद्यार्थ्यांचा संघटनेतर्फे प्रा.हर्षल पाटील, प्रा.डॉ.चंद्रकांत सरोदे, प्रा.डॉ.गौरी पाटील, प्रा.स्वाती शेळके यांनी सत्कार केला. प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ.जी.आरवाणी यांनी केले. माजी विद्यार्थ्यांपैकी प्रा.अदनान अहमद, विजयसिंह सोनवणे, रीतेश भारंबे, प्रा.भूपेंद्र बाणाईत आदी माजी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केले.

माजी विद्यार्थी संघटनेचे योगदान मोलाचे
माजी विद्यार्थी संघटनेचे सल्लागार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे यांनी नॅक टीम आल्यावर आपणास कोणकोणत्या गोष्टी विचारू शकते त्या गोष्टींना आपण कशी उत्तर द्यायची तसेच आपण संवाद साधताना कोणत्या गोष्टी आत्मसात कराव्यात याविषयीचे मार्गदर्शन केले. डॉ. मोहन फालक यांनी महाविद्यालयाच्या विकासात माजी विद्यार्थी संघटनेचे योगदान अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा.मेघा चौधरी यांनी तर आभार प्रा.डॉ.गौरी पाटील यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी कोषाध्यक्ष प्रा.हर्षल पाटील, प्रा.दीपक पाटील, प्रा.चंद्रकांत सरोदे, प्रा.स्वाती शेळके, प्रा.डॉ.सचिन येवले, प्रा.सचिन कोलते, प्रा.संगीता भिरूड यांनी परीश्रम घेतले.