भुसावळातील महसुल महिला कर्मचार्यांची रात्रीची ड्युटी रद्द करा
शिशिर जावळे यांची मुख्यमंत्र्यांसह महिला आयोगाकडे तक्रार
Abolish night duty of revenue women employees in Bhusawal भुसावळ : भुसावळ तालुक्यातील अवैध गौण खनिजाची वाहतूक रोखण्यासाठी तलाठ्यांसह मंडळाधिकार्यांचे पथक नियुक्त करण्यात आले असून रात्रीच्या कारवाईत महिला कर्मचार्यांनाही ड्यूटी लावल्यात आल्याने तातडीने रात्रपाळीची ड्यूटी रद्द करावी, अशी मागणी भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
महिला कर्मचार्यांची सुरक्षितता धोक्यात
भुसावळ तालुक्यातील डबर, वाळू, माती, मुरूमाची अवैधरीत्या वाहतूक रोखण्यासाठी रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत पथक कार्यरत झाले असून त्यात महिला कर्मचारीदेखील आहेत. महिला कर्मचारी दिवसभरामध्ये तहसील महसूल कार्यालयातील सर्व कामकाज सांभाळून पुन्हा रात्री आठ ते सकाळी वाजेपर्यंत या पथकात सेवा बजावत आहेत. शासकीय महिला कर्मचार्यांना कुठल्याही प्रकारचे शासकीय वाहन व पोलीस संरक्षण पुरवण्यात आले नसताना वैयक्तिक वाहनाद्वारे कारवाईचे आदेश असल्याने महिला सुरक्षिततेच्या प्रश्न उपस्थित होत आहे.

ही तर आदेशाची पायमल्लीच
कार्यालयीन वेळेव्यतिरीक्त थांबवणे तसेच सुटीच्या दिवशी कामावर बोलावू नये, असे शासन आदेश असतानाही त्याची पायमल्ली होत आहे. जिल्हा प्रशासन आणि भुसावळ तहसीलदार यांच्याविरुद्ध भुसावळचे सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.