Mandakini Khadse granted interim bail by PMLA court ‘या’ अटी-शर्तींद्वारे मंदाताई खडसेंना मिळाला अंतरीम जामीन
Mandakini Khadse granted interim bail by PMLA court पुणे : भोसरीतील भूखंड प्रकरणात माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना विशेष पीएमएलए कोर्टाने अंतरीम जामीन मंजूर केला आहे. 2016 च्या कथित पुणे जमीन व्यवहार प्रकरणात एक लाखांच्या जामिनावर अंतरीम जामीन मंजूर करण्यात आल्यामुळे खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विनापरवानगी देश न सोडण्याची अट
न्यायालायने मंदाकिनी खडसे यांना विनापरवानगी देश सोडू नये, असे आदेश दिले आहेत. याशिवाय न्यायालयाकडून त्यांना जेव्हाही बोलावले जाईल, तेव्हा त्यांना तपास अधिकार्यासमोर हजर राहावे लागणार आहे आणि पुराव्यांशी छेडछाड करू नका, असेही न्यायालयाने बजावले आहे. मंदाकिनी खडसे यांचे वकील मोहन टेकवडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

न्याय प्रविष्ट प्रकरण
महसूल मंत्री पदी असताना एकनाथराव खडसेंनी पुण्यातील भोसरीमधील 3.1 एकर जमिनीचा एमआयडीसीमधील प्लॉट खरेदी करण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 साली करण्यात आला होता. या जमीनीची किंमत 31 कोटी रुपये इतकी असून ती केवळ 3 कोटी 70 लाखांना विकण्यात आल्याचाही आरोप आहे. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 साली तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल 2016 रोजी या प्रकरणासंदर्भात बैठक बोलावली आणि अधिकार्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा या प्रकरणात करण्यात आला. या बैठकीनंतर अवघ्या पंधरवड्यातच उकानी यांनी खडसेंच्या नातेवाईकांना म्हणजेच पत्नी आणि जावयाला भूखंड विकला होता.