शेतकर्यांकडील 90 लाखांचा कापूस घेवून पसार झालेला वाडीशेवाळेतील आरोपी जाळ्यात
Accused from Wadishewale, who stole cotton worth 90 lakhs from farmers, in the net पिंपळगाव हरेश्वर : पाचोरा पोलिसांनी नवसारी येथून राजेंद्र भीमराव पाटील (34, वाडीशेवाळे, ता.पाचोरा) यास अटक केली आहे. पाचोरा तालुक्यातील वाडी येथील शेतकर्यांचा 85 ते 90 लाखांचा कापूस घेवून संशयीताने पळ काढल्याने त्याचा कसून शोध सुरू होता.
कापूस खरेदीनंतर काढला पळ
गतवर्षी वाडीशेवाळे आणि परीसरातील अनेक शेतकर्यांकडील 85 ते 90 लाख रुपये किंमतीचा कापूस उधार खरेदी करीत संशयीताने पळ काढला होता. कापसाचे पैसे न मिळाल्याने शेतकर्यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. पैसे परत मिळावेत, यासाठी वाडी येथील शेतकर्यांनी अनेक दिवस उपोषणही केले होते. राजेंद्र हा नवसारी (गुजरात) येथे असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नवसारी येथे पोलिसांचे पथक रवाना झाले होते. तिथून त्याला अटक करुन पिंपळगाव येथे आणण्यात आले. संशयीताला न्यायालयात हजर केले असता त्याला 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहा.पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल पवार, मुकेश लोकरे, जितेंद्र पाटील, रणजीत पाटील, शिवनारायण देशमुख, उज्वल जाधव, अभिजीत निकम, प्रवीण देशमुख यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.








