एरंडोलच्या कंपनीत दरोडा टाकणारे धुळ्यासह औरंगाबादमधील त्रिकूट जाळ्यात

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई


A trio in Aurangabad with Dhule who robs Erandol’s company जळगाव : रखवालदाराचे हातपाय बांधून कॉईलसह कॉपर लांबवणार्‍या धुळ्यासह औरंगाबादमधील त्रिकूटाच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या बांधल्या आहेत. एरंडोल शहरातील अंगारक ट्रान्सफार्मर कंपनीत 18 जानेवारी रोजीच्या मध्यरात्री दोन वाहनातून आलेल्या पाच दरोडेखोरांनी रखवालदाराचे हातपाय बांधून कंपनीतून कॉईल व कॉपर लांबवले होते. इम्रान शेख रहिम शेख (शंभर फुटी रोड., चाळीसगाव चौफुली, धुळे), वसीम खान सलार खान (खैसर कॉलनी, औरंगाबाद) व शेख असद शेख फिरोज उर्फ सलमान (बसेरा कॉलनी, औरंगाबाद) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना तपासार्थ एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी आवळल्या मुसक्या
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश चोबे, अमोल देवडे, सहायक फौजदार रवी नरवाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश मेढे, संजय हिवरकर, अश्रफ शेख, महेश महाजन, अक्रम शेख, संदीप सावडे, दीपक पाटील, पोलीस नाईक, संतोष मायकल, नंदलाल पाटील, भगवान पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, राहुल बैसाणे, ईश्वर पाटील, लोकेश माळी, भरत पाटील, अशोक पाटील, मुरलीधर पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली. धुळ्यातील आरोपीच्या ताब्यातून वाहन (एम.एच.18 डब्ल्यू 8515) ताब्यात घेण्यात आले असून अन्य पसार आरोपींचा कसून शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश आहेर करीत आहे.


कॉपी करू नका.