अमळनेर दंगलीची निवृत्त न्यायाधीशांमार्फत व्हावी चौकशी
दोषींवर कारवाईबाबत आयजींना वंचित आघाडीचे निवेदन
भुसावळ : अमळनेर शहरात दोन समाजात किरकोळ वादातून दंगल उसळल्यानंतर दगडफेक करण्यात आली होती. दंगल प्रकरणी 61 संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर 32 संशयितांना पोलिसांनी अटक केली मात्र माजी नगरसेवक सलीम टोपी यांचा मुलगा तथा दंगलीतील संशयित अशपाक न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच अमळनेर दंगलीची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी भुसावळ भेटीवर आलेल्या आय.जी.बी.जी.शेखर पाटील यांच्याकडे करण्यात आली.
भुसावळात दिले निवेदन
निवेदनाचा आशय असा की, अमळनेर दंगलीची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्च स्तरीय चौकशी करून यात दोषी पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना तत्काळ निलंबित करावे, मृत अशपाक यांच्या वारसास सरकारी सेवेत रुजू करावे, मयताच्या कुटुंबाला 50 लक्ष रुपये शासनामार्फत मदत म्हणून द्यावी, निरपराध असलेल्या संशयित आरोपींवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे, घटनास्थळी असणारे खरे दंगलखोर आणि सीसीटिव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आलेल्या विकृत मानसिकतेतील दंगल घडवणार्यांना तत्काळ अटक करावी व निरपराधांची सुटका करावी, अशी मागणी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्याकडे करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा प्रभारी रवीकांत वाघ, जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, अमळनेर तालुकाध्यक्ष दाजीबा गव्हाणे, जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद शफी, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, जिल्हा संघटक शेख याकुब शेख नजीर, मेजर देवदत्त मकासरे, शरीफ खान, अमळनेर शहराध्यक्ष संदीप सैंदाणे, शेख, पूनमचंद निकम, भीमराव वानखेडे आदी उपस्थित होते.

