चोपडा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई : सात किलो गांजासह त्रिकूट जाळ्यात
Chopda Rural Police’s swift action: Trio netted with seven kilograms of cannabis चोपडा (सोमवार, 27 जुलै 2026) : जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत चोपडा ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत 7 किलो 196 ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत गांजासह कार, मोटारसायकल, मोबाईल असा एकूण सहा लाख 8 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कारवाईने उडाली खळबळ
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर अवैध अमली पदार्थांच्या विक्री, वाहतूक व सेवनाविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचार्यांना प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. रविवार, 26 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 11.53 वाजता गुप्त माहितीच्या आधारे लासूर ते हातोड रस्त्यावर, पाटचारीजवळील हातोड शिवारात सापळा रचण्यात आला. संशयित हुंडाई कंपनीच्या सेंट्रो कार (एम.एच.14 बी.के.3113) ची तपासणी केली असता त्यामध्ये सात किलो 196 ग्रॅम गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत कारवाई केली.
या आरोपींना अटक
अटकेतील आरोपींमध्ये विष्णू सुभाष सुळे (37, पिंपरी, जि.पुणे), प्रकाश बबन शिंदे (30, रा.टाकळीमिया, ता. राहुरी, जि. अहमदनगर) आणि प्रशांत ताराचंद अघाणी (वय 21, रा. टाकळीमिया, ता.राहुरी, जि.अहिल्यानगर) यांचा समावेश आहे. आरोपींकडून एक लाख 67 हजार 100 रुपये किंमतीचा सात किलो 196 ग्रॅम गांजा, तीन लाखांची कार व 90 हजारांची बाईक तसेच 51 हजारांचे पाच मोबाईल मिळून सहा लाख आठ हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक मोहिते, किरण पारधी, गजानन पाटील, चेतन महाजन, निलेश पाटील, प्रमोद पवार, विनोद पवार, आत्माराम अहिरे आदींच्या पथकाने केली.