अरुणावती नदीत बुडाल्याने शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू
School student dies after drowning in Arunavati river शिरपूर : अरुणावती नदीमध्ये बुडून एका 11 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी घडली. दिनेश रतीलाल मोरे असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. नदीमध्ये शोधाशोध करताना वडिलांच्या हातालाच मृतदेह लागल्याने त्यांनी केलेला आक्रोश काळीज चिरणारा होता.
पोहण्यासाठी गेल्यानंतर विद्यार्थी परतलाच नाही
मयत दिनेश हा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी होता. शिरपूर तालुक्यातील सावळदे गावातील मूळ रहिवासी असलेले रतीलाल मोरे हे एस.टी.बसचालक आहेत. ते आपल्या कुटुंबासह शिरपूर शहरात वरवाडे भागामध्ये भाडेतत्त्वाच्या घरात राहतात. याठिकाणी महादेव मंदिरामध्ये कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर रतीलाल मोरे यांचा मुलगा दिनेश हा मित्रांसोबत अरुणावती नदीमध्ये पोहण्यासाठी गेला. त्यानंतर दिनेश घरी परतलाच नाही. दुपारी उशिरापर्यंत दिनेश घरी न आल्याने त्याच्या आई-वडिलांनी शोधाशोध सुरू केली. मित्रांनाही विचारपूस केली मात्र घाबरलेल्या मित्रांनी या घटनेबद्दल सांगितले नाही.
सोशल मीडियावरही तो बेपत्ता झाल्याची पोस्ट शेअर करण्यात आली होती. दरम्यान, एका मुलाने नदीमध्ये पोहायला गेल्याची माहिती दिनेशच्या आई-वडिलांना दिली. त्यानंतर मंगळवारी सकाळी दिनेशचे वडील रतिलाल मोरे यांनी आपल्या काही मच्छीमार मित्रांना नदीमध्ये शोधाशोध करण्यासाठी बोलावले. नदी पात्रात बराच काळ शोध मोहीम सुरू होती. दुर्दैवाची बाब म्हणजे पाण्यात शोध घेत असताना नदीतील गाळमध्ये फसलेला दिनेशचा मृतदेह त्याच्या वडिलांच्या हाती लागला आणि त्यांनी एकच हंबरडा फोडला.
अरुणावती नदीमध्ये वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे नदीपात्रामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमध्ये वाळू नसून गाळ आणि चिखल साचलेला आहे. दिनेश पोहत असताना खोल डबक्यामध्ये खाली गेल्याने तो चिखलामध्ये फसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




