क्रांतीदिनाचे पोस्टर फाडल्याचे पडसाद : सांगवीत तुफान दगडफेक : गावात कर्फ्यू ; 10 संशयितांना अटक
Repercussions of tearing down Kranti Day posters: Stone pelting in Sangweet storm: Curfew in village ; 10 suspects arrested शिरपूर : शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे आदिवासी क्रांती दिनाचे पोस्टर अज्ञातांनी फाडल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आल्यानंतर दोन गट भिडले. यावेळी तुफान दगडफेक करण्यात आली तसेच काही टपर्या उलथवून टाकण्यात आल्या, तर काही पेटवण्याचा प्रयत्नही झाला. यासोबतच काही गाड्यांचे काच फोडण्यात आले मात्र या वेळी होणारी मोठी दुर्घटना सांगवी पोलिसांनी प्रयत्न करून हाणून पाडली. या घटनेनंतर सांगवी संचारबंदी लागू करण्यात आली असून दहा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
पोस्टर फाडल्याचे उमटले तीव्र पडसाद
सांगवीतील जोयदा रस्त्यावरील शाळेजवळ आदिवासी क्रांती दिनाचे पोस्टर फाडल्याचे वृत्त गावात पसरताच शेकडो आदिवासी बांधवांच्या संतप्त जमावाने दुसर्या समुदायावर दगडफेक केली. पोस्टर फाडणार्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली व त्यानंतर तुफान दगडफेक करण्यात आली. धुळे येथून एसआरपी, दंगल नियंत्रण पथक, जादा पोलिस बंदोबस्त तातडीने मागवण्यात आल्यानंतर गावाला छावणीचे स्वरूप आले तर या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले असून तिघांवर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लक्ष्मण भील (वय 18), शिवदास आसाराम भील (वय 40), सुभाष विजय सोनवणे यांना गंभीर मार लागल्याने त्यांना धुळे येथे उपचारासाठी हलवण्यात आले.
आमदारांसह तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक..
दंगलीची पाहणी केल्यानंतर आमदार काशीराम पावरा, पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, तहसीलदार महेंद्र माळी शांतता प्रस्थापित करण्यासाठी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक एका बाजूने दगडफेक सुरू झाली. दगडफेकीत आमदार काशीराम पावरा आणि तहसीलदार महेंद्र माळी यांच्या गाड्यांच्या काचा फुटल्या.




