पाच लाखांची लाच भोवली : यावलच्या महालक्ष्मी पतसंस्थेवरील अवसायकास धुळे एसीबीकडून अटक
bribery of five lakhs यावल : व्यापारी संकुलातील पतसंस्थेच्या कब्जात असलेला व्यापारी गाळा व गाळ्यांची अनामत रक्कम तक्रारदाराच्या नावाने वर्ग करून देण्यासाठी पाच लाखांची लाच मागून ती धुळे बसस्थानकात स्वीकारताना विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था (प्रक्रिया) धुळे व अतिरिक्त विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (भूविकास बँक), जळगाव संस्था व अवसायक यावल श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था लि.चे सखाराम कडू ठाकरे (56, राधेय को.ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी, पाचोरा) यास धुळे एसीबीने रंगेहाथ पकडल्यानंतर लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. ही कारवाई गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास धुळे बसस्थानकात करण्यात आली.
असे आहे लाच प्रकरण
सखाराम कडू ठाकरे यांच्याकडे विशेष लेखा परीक्षक, सहकारी संस्था, (प्रक्रिया, धुळे) चा पदभार असून त्यांच्याकडे भूविकास बँकेच्या विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्थेचा अति. कार्यभारही आहे. त्याचपद्धतीने यावल येथील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेडचा अवसायक म्हणून कार्यभारही ठाकरे यांच्याकडेच आहे. नगरपरिषद सावदा, ता.रावेर येथील व्यापारी संकुलातील श्री महालक्ष्मी पतसंस्थेच्या कब्जात असलेला व्यापारी गाळा व गाळ्याची संबंधित अनामत रक्कम जळगावातील तक्रारदार यांच्या नावे वर्ग करून देण्यासाठी यातील अवसायक सखाराम ठाकरे यांनी यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 16 ऑगस्ट रोजी पाच लाखांची लाच मागितली होती. तक्रारदाराला लाच द्यावयाची इच्छा त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली व तक्रार नोंदवून पडताळणी करण्यात आली. धुळे बसस्थानकात गुरुवारी रात्री 9.30 वाजता आरोपीने तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. आरोपीविरोधात धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, चालक सुधीर मोरे यांच्या पथकाने यशस्वी केला.




