चाळीसगावात एसीबीची मोठी कारवाई : तत्कालीन जिल्हा आरोग्याधिकारी धुळे एसीबीच्या जाळ्यात
आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी 50 हजारांची लाच भोवली : लाचखोर हादरले
Big action of ACB in Chalisgaon: The then District Health Officer Dhule in ACB’s net चाळीसगाव : आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्राकरीता जागा व घर भाड्याने घेवून नियमित भाडे सुरू करण्यासाठी 50 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी जिल्हा परीषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी व विद्यमान पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी देवराम किसन लांडे (52, शशिकला नगर, चाळीसगाव) यांना धुळे एसीबीने चाळीसगावातील निवासस्थानातून सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अटक केली. या कारवाईने आरोग्य यंत्रणेतील लाचखोर हादरले आहेत. लांडे विरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असे आहे लाच प्रकरण
चाळीसगावातील 49 वर्षीय तक्रारदाराने त्यांचे घर व जागा भाडेतत्त्वावर आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्राकरीता भाड्याने देण्याबाबत जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाकडे अर्ज केला होता. तक्रारदार यांची जागा आरोग्य विभागाकडून भाडेतत्त्वावर घेवून त्यांना नियमित भाडे सुरू करण्याकरीता तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी लांडे यांनी 22 जून रोजी 50 हजारांची लाच मागितली होती मात्र लाचेचा सापळा आल्याचा संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही मात्र एसीबीकडे लाच मागितल्याचा अहवाल आल्यानंतर लांडे यांना सोमवारी दुपारी 12 वाजता चाळीसगावातील शशिकला नगरातून अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (वाचक)यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, शरद कटके, पसंतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, गायत्री पाटील, चालक हवालदार सुधीर मोरे यांच्या पथकाने केली.




