भुसावळातील नाहाटा चौफुलीसह यावल रोड अतिक्रमण मुक्त
पालिकेच्या कारवाईने बेरोजगारांवर संकट : दुकानांबाहेरील ढापेही हटवले ; अतिक्रमण न वाढण्यासाठी पालिका दररोज घेणार आढावा
Yaval road encroachment free including Nahata Chauphuli in Bhusawal भुसावळ : शहरातील यावल रोडसह जामनेर रोडवरील अतिक्रमणामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता पालिकेने गुरुवार, 12 रोजी अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबवली. मोहिमेपूर्वीच बहुतांश व्यावसायीकांनी आपापली दुकाने, टपर्या, लोटगाड्या हटवल्या होत्या तर काहींनी मात्र पक्के अतिक्रमण न हटवल्याने या अतिक्रमणावर पालिकेने बुलडोझर फिरवला. रस्त्याच्या कडेला उभारलेल्या टपर्या, वेदर शेडस् तसेच व्यावसायीकांनी विनापरवानगी बांधलेले ओट्यांचे अतिक्रमण जेसीबीद्वारे हटवण्यात आले तर न्यायालयाबाहेरील फुटपाथही मोकळा करण्यात आला तर नाहाटा चौफुलीवर पथक धडकण्यापूर्वीच परीसर अतिक्रमणमुक्त झाल्याने कारवाई करण्याची गरज भासली नाही.
यावल रोडपासून मोहिमेला सुरूवात
गुरुवारी सकाळी 11 वाजता यावल रोडवरील साईजीवन सुपर शॉपी समोरून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला सुरूवात करण्यात आली. रस्त्यावर ज्युस सेंटर थाटणार्या व्यावसायीकाला साहित्य आत घेण्यास बजावल्यानंतरही संबंधिताने दखल न घेतल्याने ज्युस सेंटरमधील साहित्य पथकाने जप्त केले तर शांती नगराकडे जाणार्या रस्त्यावरील रेडियम चालकासह तीन दुकानांवर बुलडोझर फिरवण्यात आला तसेच यावल रोडवरील टपर्या मोहिम सुरू होण्यापूर्वीच हटवण्यात आल्याने पथकाने रस्त्यावर लावलेले अनधिकृत फलक पाडले व त्यानंतर यावल रोडवरील गांधी पुतळ्याजवळ पथक धडकले. तलाठी कार्यालयाला लागून तीन दुकानांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याने संबंधिताना तातडीने जागा खाली करण्याचे निर्देश दिल्यानंतर दुपारीच टपर्या हटवण्यात आल्याने प्रथमच हा परीसर मोकळा झाला.




व्यावसायीकांचे अतिक्रमित ढापे तोडले
यावल रोडवरील गांधी पुतळा ते शहर पोलिस ठाण्यापर्यंतच्या रस्त्यावरील व्यावसायीकांनी अनधिकृतपणे पालिकेच्या गटांरीवर फरशी टाकून ढापे बनवल्याने जेसीबीद्वारे सर्व ढापे नष्ट करण्यात आले. हे अतिक्रमण काढताना व्यावसायीकांच्या पाईप लाईनदेखील फुटल्या. भुसावळ सत्र न्यायालयाबाहेर असलेल्या फुटपाथवर व्यावसायीकांनी फरशी टाकून अतिक्रमण केल्याने जेसीबीद्वारे सर्व फरशा तोडण्यात आल्या व प्रथमच फुटपाथ मोकळा झाल्याचे दिसून आले.

कारवाईला पदाधिकार्यांचा विरोध
न्यायालयाबाहेर पथकाकडून कारवाई सुरू असताना भीम आर्मीचे गणेश सपकाळे यांनी कारवाईला तीव्र विरोध दर्शवला. सणा-सुदीत अतिक्रमण हटवू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करीत कारवाईबाबत बेरोजगारांच्या पोटावर कुर्हाड कोसळेल, असे सांगत अतिक्रमण मोहिम थांबवण्याची विनंती केली मात्र प्रशासनाला सहकार्य केल्यास पालिकाही सहकार्य करेल, अशी भूमिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी घेतली. पालिकेच्या पाच अटी व्यावसायीकांनी पाळल्यास संबंधितांना पुन्हा या जागेत व्यवसाय करण्यास परवानगी देवू, असे आश्वासन मुख्याधिकार्यांनी दिल्याने विरोध मावळला. आरपीडी रोडवर रीपाइंचे सुदाम सोनवणे यांनी मोहिम न राबवण्यासाठी विरोध दर्शवला.
तार ऑफिस रोडवर दुकान पाडले
तार ऑफिस रोडवरील एक अतिक्रमित दुकान जेसीबीद्वारे पाडण्यात आले तर सुमारे सहा व्यावसायीकांनी लाखोंची पालिका कराची थकबाकी न भरल्याने त्यांच्या गाळ्यांना सील ठोकण्यात आले मात्र पालिकेकडून गाळे सीलची कारवाई होत असताना सुमारे आठ व्यावसायीकांनी तातडीने पालिका कराचा भरणा केल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली. यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक कराची वसुली करण्यात आल्याचे उपमुख्याधिकारी लोकेश ढाके म्हणाले.
अधिकार्यांसह 150 कर्मचार्यांचा पथकात समावेश
अतिक्रमण मोहिमेत पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, मुख्याधिकारी महेश वाघमोडे, उपमुख्याधिकारी लोकेश ढाके, आस्थापना प्रमुख वैभव पवार, कार्यालय अधीक्षक परवेज शेख, पाणीपुरवठा अभियंता सतीश देशमुख, जितेंद्र पाटील, अग्निशमन दलप्रमुख विवेक माकोडे, अभियंता नंदकिशोर येवतकर, अभियंता महेश चौधरी, दीपक चौधरी, प्रदीप पवार, वसंत राठोड यांच्यासह सुमारे 150 कर्मचारी सहभागी झाले. अतिक्रमण हटवण्यासाठी दोन जेसीबी व दोन ट्रॅक्टरचा वापर झाला तर दोन दुय्यम पोलिस अधिकारी तथा 10 पोलिस कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त राखला.
अतिक्रमण न होण्यासाठी स्वतः दररोज आढावा घेणार
शहरातील यावल रोड व नाहाटा चौफुलीवरील अतिक्रमण हटवल्यानंतर आता पुन्हा या भागात अतिक्रमण न होण्यासाठी स्वतः दररोज फिरून आढावा घेणार असल्याचे प्रशासक जितेंद्र पाटील म्हणाले. शहरातील उर्वरीत भागातील अतिक्रमण दिवाळीनंतर काढण्यात येईल, असेही प्रशासक म्हणाले.