धुळ्यातील प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांसह वरीष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

शिक्षकाच्या बदलीसाठी 35 हजारांची लाच भोवली : कारवाईने खळबळ


Senior Assistant in ACB Network with Primary Education Officer in Dhule धुळे : शिक्षक बदलीचा अर्ज शिफारशीसह उपमुख्याधिकार्‍यांकडे पाठवण्यासाठी तडजोडीअंती 35 हजारांची लाच स्वीकारताना धुळे जल्हा परीषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश दिनकर साळुंखे (50, धुळे) व वरीष्ठ सहाय्यक विजय गोरख पाटील (52, धुळे) यांना धुळे एसीबीने लाच स्वीकारताच गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या दालनातच अटक केली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

असे आहे लाच प्रकरण
रामपूर, ता.शिरपूर येथील उपशिक्षक या प्रकरणात तक्रारदार आहेत.पेसामधून नॉनपेसात बदली होण्यासाठी खंडपीठाने आदेश दिल्यानंतर धुळे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे अर्ज करण्यात आला होता व या अर्जावर सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असा शेरा मिळाल्यानंतर हा अर्ज शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे यांच्याकडे आला. सप्टेंबर महिन्यात तक्रारदाराने साळुंखे यांची भेट घेतल्यानंतर शिफारस करण्यासाठी 25 हजारांची लाच मागण्यात आली व 20 हजारांवर तडजोड झाली तर वरीष्ठ सहाय्यक विजय पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडून बदली आदेश मिळवून देण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाले, कार्यालय अधीक्षक पराग धात्रक व शिक्षक, इतर कार्यालयीन कर्मचार्‍यांकरीता 66 हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने धुळे एसीबीकडे याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणीत साळुंखे यांनी तडजोडीअंती 20 हजार तर विजय पाटील यांनी तडजोडीअंती 51 हजार रुपये स्वीकारण्याचे कबुल करीत 35 हजार रुपये पहिल्या हप्त्यात स्वीकारण्याचे कबुली दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. गुरुवार, 26 रोजी दुपारी चार वाजता पाटील यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली व नंतर लाच मागणीत साळुंखे यांचाही सहभाग असल्याने त्यांनाही अटक करण्यात आली. दरम्यान, लाच प्रकरणात आता उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह अनेकांची नावे समोर आल्याने त्यांच्यादेखील अडचणी वाढल्या आहेत.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, रामदास बारेला, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण मोरे,प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने यशस्वी केला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !