सुसंवादासाठी शब्दांमधील सकारात्मक ऊर्जा जिवंत ठेवा

अंतर्नाद पुष्पांजली प्रबोधनमाला : व्याख्याते ज्ञानेश्वर शेंडे यांचा तरुण वर्गाला सल्ला


भुसावळ : संपूर्ण सजीव सृष्टीत व्यक्त होणे ही माणसाकडे असलेली सर्वात मोठी शक्ती आहे. शब्दांमधील सकारात्मक ऊर्जा जिवंत ठेवली तर माणसाला माणसापर्यंत पोहोचता येईल. सकारात्मक सुसंवाद साधण्यासाठी आधी स्वतःशी चांगला संवाद साधा, असा सल्ला व्याख्याते ज्ञानेश्वर शेंडे यांनी तरुण वर्गाला दिला. अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गुरुवार, 7 रोजी नहाटा महाविद्यालय येथे माजी खासदार तथा आमदार कृषी मित्र स्व.हरिभाऊ जावळे व स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित पुष्पांजली प्रबोधन मालेचे प्रथम पुष्प लेखक आणि व्याख्याते ज्ञानेश्वर शेंडे यांनी गुंफले. ऊर्जा सकारात्मक संवादाची या विषयावर ते बोलत होते.

यांची विचार मंचावर उपस्थिती
विचार मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल शहराचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सचिव विष्णू चौधरी, नाहाटा महाविद्यालयाचे उपप्राचार्य वाय.एम.पाटील, पर्यवेक्षक स्वाती पाटील, प्रकल्प प्रमुख शैलेंद्र महाजन, सहसमन्वयक डॉ.संजू भटकर, सहसमन्वयक प्रा.शाम दुसाने उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रकल्प प्रमुख शैलेंद्र महाजन यांनी अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येणार्‍या विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व पर्यावरण पूरक उपक्रमांची माहिती दिली. माजी खासदार तथा आमदार कृषी मित्र स्व.हरिभाऊ जावळे व स्व.पुष्पा वसंतराव पाटील यांच्या विषयी कृतज्ञता म्हणून दरवर्षी पुष्पांजली प्रबोधन मालेचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी अंतर्नाद प्रतिष्ठानचे कार्य समाजाला चांगली दिशा मिळवून देण्यासाठी अनमोल असल्याचे सांगितले.







अंगी संस्कारांची रुजवणूक करा
आपल्या अंगी संस्कार रुजले पाहिजे तरच आपण इतरांशी नम्रपणे बोलू शकतो. आपल्या विचारातून व्यक्तिमत्त्व दिसून येते आणि त्यातूनच समोरच्या व्यक्तीचे आपल्याशी संवाद कसा ठेवायचा याबाबतचे निर्णय ठरतात. संवाद साधताना देहबोली नम्र असावी, असे ज्ञानेश्वर शेंडे यांनी सांगितले. खर्‍या प्रेमात असलेला संवाद खर्‍या प्रेमात संवाद साधताना त्यात बाष्कळपणा नसतो. डॉ.प्रकाश आमटे, डॉ.अभय बंग व डॉ.राणी बंग, पु.ल.देशपांडे व सुनिताताई देशपांडे यांच्या जीवन प्रवासातून प्रेम हे निर्माण करायला शिकवतं याची प्रचिती होत असल्याचे ज्ञानेश्वर शेंडे यांनी सांगितले.

यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
प्रबोधनमालेसाठी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, जळगावचे उद्योजक अजय बढे आणि दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सूत्रसंचालन योगेश इंगळे यांनी तर आभार संजू भटकर यांनी मानले. यावेळी अंतर्नाद प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य ज्ञानेश्वर घुले, समाधान जाधव, देव सरकटे, हितेंद्र नेमाडे, प्रदीप सोनवणे, मंगेश भावे, चंद्रकांत सूर्यवंशी, विजय बावस्कर, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियोजन समिती सदस्यांनी परीश्रम घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !