अट्रावल शेत शिवारात अज्ञात माथेफिरूने केळीचे दोन हजार घड कापले : अडीच लाखांचे नुकसान
2000 bunches of banana cut by unknown mathefiru in Atraval farm Shiwar : loss of 2.5 lakhs यावल : यावल तालुक्यातील अट्रावल या गावात अज्ञात माथेफिरूने शेतकर्याच्या कापणीयोग्य झालेले केळी पिकाचे नुकसान केले. तब्बल दोन हजार केळीचे घड कापून नासधुस करण्यात आल्याने शेतकर्याचे तब्बल अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलिसात अज्ञात माथेफिरूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.
अज्ञात माथेफिरूविरोधात गुन्हा
अट्रावल, ता.यावल येथील शेतकरी राजेंद्र व्यंकट चौधरी यांनी चिंतामण पंढरीनाथ तायडे यांचे शेत गट क्रमांक 455 हे बटाईने केलेले आहे. या शेतात त्यांनी केळी पिकाची लागवड केली होती व आता केळी कापणीवर आली आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी तोंडी बोलणी करून कापणीवर आलेली केळीच्या व्यवहार व्यापार्यासोबत केला होता व प्रती घड पाच हजार 500 रूपयात दिला होता व त्यातील दिड हजार घड कापणीदेखील झाली होती. उर्वरीत केळीच्या घडापैकी दोन हजार केळीच्या झाडावरील घड शुक्रवारी मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात माथेफिरूने त्यांच्या शेतात जाऊन कापून नासधुस केली. यात शेतकर्याचे जवळपास अडीच लाखांचे नुकसान झाले.


याप्रकरणी यावल पोलिसात चिंतामण तायडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरू इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
