चोपडा तालुक्यात गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूसासह कोल्हापूरातील तरुणाला पकडले
चोपडा ग्रामीण पोलिसांची कामगिरी : शस्त्र तस्करी पुन्हा ऐरणीवर
A youth from Kolhapur was caught with a Gavathi pistol and two live cartridges in Chopda taluka चोपडा : चोपडा ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस बाळगणार्या कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. शुभम प्रकाश सूर्यवंशी (22, रा.पतन कोडावली जुने बसस्थानकासमोर, गोकुळ हॉटेल शेजारी, हातकणंगले, ता.कोल्हापूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, शस्त्र तक्रारीचा मुद्दा पुन्हा समोर आला असून शस्त्र कारखान्यांवर समूळ कारवाई करण्यासह शस्त्रांचा पुरवठा करणार्या दलालांवर पोलिस दलाने लक्ष केंद्रीत करावे, अशी अपेक्षा आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील बोर अजंटी फॉरेस्ट नाक्यासमोर संशयित पिस्टल बाळगून असल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी संशयित शुभम सूर्यवंशी यास ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीत त्याच्याकडून 13 हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी कॉन्स्टेबल गजानन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक शेषराव नितनवरे करत आहेत.


