भुसावळ शहरात दुसर्या दिवशी आठ रोडरोमिओंवर कारवाई
पोलिसांच्या कृतीचे पालक वर्गातून स्वागत ः शहर, बाजारपेठ व शहर वाहतूक शाखेच्या कारवाईने खळबळ
Another day, action was taken against eight roadromios in Bhusawal city भुसावळ : शाळा-महाविद्यालयाच्या आवारात टवाळकी करणार्यांविरोधात भुसावळ पोलिस दलाने गुरुवारपासून धडक मोहिम उघडली आहे. निर्भया पथकाच्या माध्यमातून कारवाई केली जात असताना शुक्रवारी शहर व बाजारपेठ पोलिसांनीही त्या-त्या हद्दीतील शाळा-महाविद्यालयांच्या आवारात गस्त करीत विनाकारण रस्त्यावर दुचाकी लावून थांबून असलेल्या, उनाडक्या करणार्या आठ टवाळखोरांविरोधात कारवाई केली तर शहर वाहतूक शाखेने चौघांवर मोटार व्हेईकल अॅक्ट अन्वये कारवाई केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
रोडरोमिओंचे दणाणले धाबे
शहरातील विविध नामांकीत महाविद्यालयात शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुलींसह युवती शिक्षणासाठी येतात मात्र बसमध्ये, बसस्थानकावर तसेच महाविद्यालयाच्या आवारात येत असताना रोडरोमिओंकडून त्यांना छेडखानीच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर पोलिस प्रशासनाने अशा टपोरींविरोधात भुसावळचे सिंघम पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वात धडक कारवाईची मोहिम उघडण्यात आली आहे. या कारवाईमुळे रोडरोमिओंचे धाबे दणाणले आहे तर पालकवर्गातून पोलिसांच्या कृतीचे स्वागत होत आहे..


आठ जणांवर कारवाई : चौघांना केला दंड
शुक्रवारी दुसर्या दिवशी शहर हद्दीत पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मोहम्मद अली सैय्यद, नाईक समाधान पाटील व नाईक जाकीर मन्सुरी आदींच्या पथकाने चौघा अल्पवयीनांना पकडल्यानंतर त्यांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली. बाजारपेठ हद्दीत दे.ना.भोळे कॉलेज तसेच पु.ओं.नाहाटा महाविद्यालयाच्या परीसरात चौघा टवाळक्या करणार्यांविरोधात बीपी अॅक्ट अन्वये कारवाई करण्यात आली. बाजारपेठ पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर, हवालदार रमण सुरळकर व चालक सुनील सोनवणे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. भुसावळ शहर वाहतूक शाखेने सेंट अलॉयसीस, के.नारखेडे तसेच प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या आवारात विनाकारक दुचाकीवरून फिरणार्या चौघांवर मोटार व्हेईकल अॅक्ट अन्वये कारवाई केली. शहर वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक निलेश गायकवाड, शहरचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, हवलदार संजय भदाणे, भाऊसाहेब पाटील, हवालदार संदीप पालवे आदींचा पथकात समावेश होता.
