पंचवटीतील सराईत गुन्हेगाराची अपहरणानंतर हत्या : नाशिकमध्ये खुनांचे सत्र कायम
नाशिक : पंचवटीतून एका सराईत गुंडाची अपहरणानंतर हत्या करण्यात आली तर धक्कादायक बाब म्हणून खूनानंतर संशयिताचा मृतदेह पेटवून देण्यात आला. ही धक्कादायक घटना रविवार, 11 रोजी उघडकीस आली. संदेश चंद्रकांत काजळे (35, रा.विजयनगर, सिडको) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. मयताच्या मित्रांनीच आर्थिक वादातून त्याचा काटा काढल्याचे बोलले जात आहे.
सराईत गुंडाच्या हत्येने खळबळ
पंचवटी भागात गंभीर स्वरूपाचे गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला सराईत गुंड आणि खासगी सावकारी करणारा काजळे यास मद्याच्या नशेत असताना त्याच्या चार ते पाच मित्रांनी त्याला निमाणी बस स्थानकासमोरील एका इमारतीच्या पार्किंगमधून मारहाण करत मोटारीत डांबले व मोखाडा येथे घेऊन जाऊन त्याचा खून करत खूनाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून जाळण्याचाही प्रयत्नही करण्यात आला. घटनास्थळाहून अर्धवटस्थितीत जळालेला मृतदेह मोखाडा पोलिसांनी ताब्यात घेतला.


गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मुख्य सूत्रधार आरोपी स्वप्निल उन्हवणे यास अटक केली. अपहरणासाठी वापरलेल्या गुन्ह्यातील कारही जप्त करण्यात आली. उन्हवणे याच्यासोबत असलेल्या साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. सराईत गुंड काजळे याच्यावर यापूर्वी खंडणी, अवैध सावकारी, मारहाण, खूनाचा प्रयत्न, फसवणूक, दमदाटी, अॅट्रासिटीसह विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
