ऐनपूरातील तुंबळ हाणामारीप्रकरणी 13 संशयितांना अटक
गावात तणावपूर्ण शांतता : पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
13 suspects arrested in Ainpur riot खिर्डी : रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे ट्रॅक्टरची तक्रार तहसीलदारांकडे केल्याच्या संशयातून दोन गटात तुंबळ हाणामारी होवून दगडफेक करण्यात आली. या घटनेत दोन पोलिसांसह अन्य पाच जण जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी 10 वाजता बसस्थानक परीसरात घडली. याप्रकरणी एका गटाच्या तक्रारीवरून 12 संशयितांविरोधात अॅट्रासिटी व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला तर पोलिसांना धक्काबुक्की करीत हल्ला केल्याप्रकरणी 20 संशयितांसह अन्य आठ ते दहा अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी 13 संशयितांना अटक केली आहे. गावात तणाणपूर्व शांतता असून पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तक्रार केल्याच्या संशयातून जातीवाचक शिविगाळ
कुंदन गंभीर तायडे (19, ऐनपूर) या तरुणाच्या तक्रारीनुसार, ट्रॅक्टरबाबत तहसीलदारांकडे तक्रार केल्याच्या संशयातून संशयितांनी वाद उकरून काढत जातीवाचक शिविगाळ करीत तक्रारदारासह साक्षीदारांना लाठीने मारहाण केली तर पोलिस आल्यानंतरही संशयितांनी आमच्या वादात पडू नका, असे सांगून पोलिसांनाच धक्काबुक्की केली. याप्रकरणी 12 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह करीत आहेत.


पोलिसांना धक्काबुक्की : 21 संशयितांविरोधात गुन्हा
ऐनपूरात पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर दोन गटात तुंबळ हाणामारी सुरू होती शिवाय पोलिस पोहोचल्यानंतरही दगडफेक सुरू होती. पोलिसांनी संशयितांना आवर घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. 21 संशयितांसह अन्य आठ ते दहा अनोळखीविरोधात दंगल, हाणामारीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दगडफेकीने घबराट : दुकाने बंद
दोन गटात वाद निर्माण झाल्यानंतर किरकोळ दगडफेक करण्यात आल्यानंतर ऐनपूर गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी पटापट आपली दुकाने बंद केली तर विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीमुळे शाळांमध्येही शुकशुकाट जाणवला. दगडफेकीसह हाणामारीत दोन पोलिस कर्मचार्यासह पाच ग्रामस्थ जखमी झाल्याचे सांगण्यात आले. तणावाची परीस्थिती तत्काळ निंभोरा, रावेर, सावदा वरणगाव, फैजपूर येथून पोलिसांचे पथक गावात तैनात करण्यात आले शिवाय जिल्ह्यावरून एसआरपी तसेच दंगा नियंत्रक पथकालाही पाचारण करण्यात आले.
पोलिस अधिकार्यांची धाव
जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, प्रांताधिकारी देवयानी यादव, तहसीलदार बी.एम.कापसे, नायब तहसीलदार संजय तायडे निंभोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक हरीदास बोचरे, वरणगावचे उपनिरीक्षक किशोर पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष जगन्नाथ पाटील, सरपंच अमोल महाजन, मंडळाधिकारी जी.एन.शेलकर, तलाठी शरद सूर्यवंशी, पोलिस पाटील दीपाली तायडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. निळे निशान सामाजिक संघटनेेचे संस्थापक आनंद बाविस्कर, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील, धुमा तायडे, सावंत मेढे, लक्ष्मीबाई मेढे आदींनी घटनास्थळी धाव घेत गावात शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले.
