अवैध वाळू वाहतूक रोखल्याचा राग : रावेरात तलाठ्यास धक्काबुक्की
रावेर : तलाठ्याने अवैध वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टरला रोखल्याचा राग आल्याने ट्रॅक्टरचा चालकासह त्याच्या साथीदाराने तलाठ्यास धक्काबुक्की करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ही घटना तालुक्यातील केर्हाळे येथे घडली. याबाबत रावेर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अवैध वाळूवर कारवाई केल्याचा राग
केर्हाळे येथील रसलपूर रोडवर शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास तलाठी रवी भागवत शिंगणे यांनी केर्हाळे येथे अवैध वाळूने भरलेले ट्रॅक्टर दिसल्यानंतर ट्रॅक्टर अडवले असता ट्रॅक्टर चालक मोहम्मद इतबार तडवी व अशपाक उर्फ करण तडवी दोघांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला व तलाठी यांना धक्काबुक्की केली तर करण तडवी याने वाळूने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली घटनास्थळावरून पळवली. याबाबत रावेर पोलिसात तलाठी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.


