शेताच्या बांधावर शिरागड येथील तरुण शेतकर्यानं घेतला टोकाचा निर्णय
यावल: यावल तालुक्यातील शिरागड येथील अविवाहित तरुण शेतकर्याची आपल्या शेताच्या बांधावर गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. महेश कैलास सोळ्के (25, शिरागड, ता.यावल) असे मयत शेतकर्याचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
महेश या अविवाहित तरुण शेतकर्याने शुक्रवार, 16 फेब्रुवारी रोजी सकाळी आपल्या गट क्रमांक 118 या शेताच्या बांधावर असलेल्या निंबाच्या झाडावर दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही.


याबाबत शिरागड गावातील पोलिस पाटील सुधाकर नारायण सोळुंके यांनी खबर दिल्यावरून यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉस्टेबल सिकंदर तडवी हे करीत आहे.
