यावलला ट्रकची ताडपत्री बांधताना तोल गेल्याने चालकाचा मृत्यू
यावल : शहराच्या बाहेर चोपडा रस्त्यावर महाजन पेट्रोल पंपाजवळ ट्रकच्या ताडपत्रीचा दोर बांधताना तोल जाऊन पडल्याने चालकाचा मृत्यू ओढवला. ही दुर्घटना रविवारी रात्री नऊ वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मयत चालकाचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. मयत हा मध्य प्रदेशातील इंदोर येथील रहिवासी असून त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे.
तोल जावून पडल्याने मृत्यू
यावल शहराबाहेर चोपडा रस्त्यावर महाजन पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपाजवळ ट्रक (क्रमांक एम.पी.09 एच. जी. 2489) थांबवून चालक संतोष (रा.इंदोर, मध्यप्रदेश) हा ट्रक वरील ताडपत्रीला दोर बांधत होता. ताडपत्री बांधत असतांना अचानक त्याचा तोल गेला आणि तो सरळ रस्त्यावर कोसळला.


त्यात त्याच्या डोक्याला जबर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. या दुर्घटनेची माहिती आरडा-ओरड करून ट्रक वरील क्लीनर उपेंद्र राजकुमार चव्हाण याने नागरीकांना दिली. घटनास्थळी अयाज खान, इम्तियाज शेख सह नागरिक दाखल झाले व त्यांनी पोलिसांना माहिती दिली असता पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे हे पथकासह दाखल झाले व मृतदेह तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मयत संतोष याचे कुटुंबीय इंदोर मध्यप्रदेश येथे राहत असून त्यांच्या कुटुंबाला या दुर्घटनेची माहिती देण्यात आली आहे.
