अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून मजुराचा मृत्यू


यावल : अवैध वाळू वाहून नेणार्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात मजुराचा मृत्यू झाला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

अवैध वाळू वाहतुकीने घेतला मजुराचा बळी
यावल तालुक्यातील चिखली खुर्द गावाजवळच्या एका शेतात अवैध वाळू उपसा करणार्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याची घटना घडली. या संदर्भात यावल पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चिखली खुर्द येथील शेताजवळ यावल तालुक्यातील टाकरखेडा येथील निवासी असलेल्या विनोद राजू कोळी (36) हा चालक अवैध वाळू आपल्याकडील विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाहून नेत होता.



दोघांविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, तो वेगाने ट्रॅक्टर चालवत असतांना अचानक ट्रॉली उलटली. यात ट्रॉलीमध्ये बसलेला विष्णू टिलकचंद सोनवणे ( 41, रा.भालशीव, ता.यावल) हा इसम याखाली दबला गेल्याने जागीच ठार झाला. या संदर्भात, चिखली खुर्द येथील पोलीस पाटील रवींद्र बाबुराव सावळे यांनी फैजपूर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रॅक्टरचा मालक काशीनाथ नथ्थू कोळी (भालशीव, ता.यावल) आणि चालक विनोद राजू कोळी यांच्या विरोधात भादंवि कलम 304 अ, 279, 337, 338, 379, 109 तसेच महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 मधील अधिनियम 48 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार राजेश बर्‍हाटे व उमेश चौधरी हे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !