धुळ्यातील बनावट जीएसटी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग


Investigation of fake GST case in Dhule handed over to CID धुळे : राज्यभरात गाजत असलेल्या धुळ्यातील बनावट जीएसटी अधिकारी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. लाखो रुपयांची अवैधी वसुली या प्रकरणात झाल्यानंतर खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे या प्रकरणात धुळे पोलीस दलातीलच दोघांचा सहभाग उघड झाला होता तर लाखो रुपयांची अवैध वसुली संशयितांनी अन्य साथीदारांच्या मदतीने ऑनलाईन केली होती. धुळ्यातील आझादनगर पोलिसात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. फसवणूक प्रकरणाची मोठी आर्थिक व्याप्ती पाहता सीआयडीकडे हा तपास वर्ग झाला आहे. दरम्यान, सीआयडीकडून या गुन्ह्याचा तपास होणार असल्याने आता कुणा-कुणाला बेड्या पडणार ? याकडे धुळ्यातील सुज्ञ जनतेचे लक्ष लागले आहे.

लाखो रुपयांची फसवणूक
पंजाब येथील व्यापारी कश्मीरसिंग सरदार हजारसिंग बाजवा (59) यांचा मुंबई आग्रा-राष्ट्रीय महामार्गावरून (पीबी 11 सीझेड 0756) क्रमांकाचा ट्रक अनोळखी चार जणांनी अडवल्यानंतर आपण जीएसटी विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करीत 12 लाख 96 हजारांच्या दंडाची मागणी केली होती. तडजोडीअंती एक लाख 30 हजार रुपये गुगल पेच्या माध्यमातून स्वीकारल्यानंतर बाजवा यांना हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे कळताच त्यांनी धुळ्यात धाव घेत आझादनगर पोलिस ठाण्यात 4 जानेवारी रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

पोलिसच निघाले आरोपी
धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक एस.ऋषीकेश रेड्डी यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला. पोलिसांनी संशयितांची गुन्हा करण्याची पद्धत, तांत्रिक विश्लेषण करून बिपीन आनंदा पाटील (47), इम्रान ईसाक शेख (51, दोघे रा.धुळे) या दोन पोलीस कर्मचार्‍यांची नावे निष्पन्न केली तर संशयित बिपीनच बहिण स्वाती रोशन पाटील हिचे नाव समोर आले. अधिक चौकशी केली असता 71 लाख 33 हजार 984 रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. दोघा पोलीस कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली. या प्रकरणात आजवर जे ऑनलाईन व्यवहार झाले आहेत ते सर्वाधिक एचडीएफसी बँकेतील असून बिपीनची बहिण स्वाती ही पूर्वी एचडीएफसी बँकेत काम करीत असल्याचे तपासातून समोर आले होते.

पोलीस महासंचालकांचे आदेश
फसवणूक प्रकरणाची व्याप्ती व त्यातील बडे संशयित पाहता या प्रकरणात तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा, असे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक यांनी काढले आहेत. शुक्रवार, 8 मार्च रोजी हा गुन्हा सीआयडीकडे वर्ग करण्याची आल्याची सूत्रांनी दिली.


कॉपी करू नका.