धुळ्यातील कुविख्यात गुन्हेगारांचे त्रिकूट एक वर्षासाठी हद्दपार


A trio of notorious criminals from Dhule exiled for a year धुळे : सामाजिक शांततेला अडसरू ठरू पाहणार्‍या उपद्रवींविरोधात जिल्हा पोलीस दलाकडून सातत्याने कारवाई सुरूच आहे. शहरातील गुन्हेगारांच्या त्रिकूटाला धुळे प्रांताधिकार्‍यांनी एक वर्षांसाठी हद्दपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रतीक उर्फ प्रकाश मल्ल्या बडगुजर (वरखेडी रोड, धुळे), प्रशांत उर्फ टिंकू प्रकाश बडगुजर (वरखेडी रोड, धुळे) व भूषण राजेंद्र माळी (सुभाष नगर, जुने धुळे) अशी हद्दपार संशयितांची नावे आहेत.

संशयितांविरोधात गंभीर गुन्हे दाखल
तीन्ही संशयितांविरोधात लोकांवर दादागिरी करणे, दहशत निर्माण करणे, शरीराविरोधात गंभीर गुन्हे (खुनाचा प्रयत्न, दरोडा, विनयभंग, अनधिकृतपणे घरात प्रवेश, शिविगाळ करून ठार मारण्याचा प्रयत्न) दाखल आहेत. पोलीस उपअधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांनी संशयितांना हद्दपार करण्याबाबत प्रांताधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यावर सुनावणी होवून संशयितांना एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले असून त्यांना दोन दिवसांपूर्वीच चाळीसगाव शहरात सोडण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक ऋषीकेश रेड्डी, गुन्हे शाखा निरीक्षक दत्तात्रय शिंदे, आझादनगर पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, पोलीस उपनिरीक्षक ए.एस.सुरवाडे, गुन्हे शाखेचे हवालदार संतोष हिरे, कॉन्स्टेबल हर्षल चौधरी, हवालदार कबीर शेख आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.