रावेर लोकसभेत महाविकास आघाडीचे मराठा कार्ड : अॅड.रवींद्र पाटील वा श्रीराम पाटलांना उमेदवारी ?
माजी आमदार संतोष चौधरी यांचेही नाव चर्चेत : अंतीम निर्णयाकडे लागले लक्ष
Mahavikas Aghadi’s Maratha card in Raver Lok Sabha: Adv. Ravindra Patil or Shriram Patil’s candidacy? भुसावळ : रावेर लोकसभेत भाजपाने खासदार रक्षा खडसे यांना तिसर्यांदा उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात प्रचाराला सुरूवात केली मात्र पंधरा दिवस उलटूनही महाविकास आघाडीचा उमेदवार ठरत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी व रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील यांची नावे चर्चेत आल्यानंतर माजी खासदार स्व.अमोल जावळे यांचे सुपूत्र अमोल जावळे हे महाविकास आघाडीत दाखत होवून त्यांना उमेदवारी मिळेल, अशीदेखील चर्चा होती मात्र या सर्व चर्चा फोल ठरल्या. आता रावेर लोकसभेसाठी आघाडीकडून अॅड.रवींद्र पाटील यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे व त्यांना उमेदवारी न मिळाल्यास भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी वा रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील यांच्यापैकी एकाला संधी मिळेल, अशी शक्यता आहे. या संदर्भातील घोषणा सोमवारी सायंकाळपर्यंत अथवा मंगळवारी सकाळी 11 महाविकास आघाडीच्या नरीमन पॉईंट येथील पत्रकार परीषदेत होण्याची शक्यता आहे.
रावेर मतदारसंघासाठी मराठा कार्ड ?
राष्ट्रवादीचा शरद पवार गट गत अनेक दिवसांपासून रावेर मतदार संघात एका मातब्बर उमेदवाराचा शोध घेत होता. यासंबंधी मुंबईत बैठक घेण्यात आली. त्यात रावेर मतदार संघाची उमेदवारी अॅड.रवींद्र भैयासाहेब पाटील मिळेल, अशी चर्चा आहे मात्र त्याबाबत अधिकृतरीत्या कुठलीही माहिती मिळू शकली नाही. अॅड.रवींद्र पाटील हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत.
संतोष चौधरी यांचे नावही चर्चेत
भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांना पक्षाने कामाला लागा म्हणून शब्द दिल्यानंतर त्यांनी भुसावळात जोरदार वातावरण निर्मिती केली मात्र प्रत्यक्षात 15 दिवसानंतरही त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. माजी आमदार संतोष चौधरी यांचे शहर व ग्रामीण भागात जोरदार नेटवर्क आहे, शिवाय कार्यकर्त्यांनाही त्यांना उमेदवारी मिळण्याची आशा आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांनाच उमेदवारी जाहीर होईल, अशी आशा समर्थकांना आहे.
भाजपाला कडवे आव्हान देण्यासाठी शरद पवारांच्या रणनितीकडे लक्ष
रावेर हा भाजप नेते गिरीश महाजन व सध्या शरद पवार गटात असणारे तथा लवकरच भाजपात जाणार्या आमदार एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला आहे. गत अनेक वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने येथून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपाशी दोन हात करता येईल व तुल्यबळ लढत होण्याच्या दृष्टीने शरदचंद्र पवार आता या मतदारसंघासाठी काय निर्णय घेतात ? याकडे लक्ष लागले आहे.
आज पुण्यातील बैठकीत उमेदवारीवर शिक्कामोर्तब !
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज पुण्यात बैठक होत आहे. या बैठकीत सातारा, माढा व रावेर या तीन लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून अॅड रवींद्र भैय्या पाटील यांच्यासह भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी तसेच उद्योजक श्रीराम पाटील यांच्या पैकी एका नावावर शिक्कामोर्तब होईल, असे सूत्रांनी सांगितले. सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे किंवा पृथ्वीराज चव्हाण तर माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील, अनिकेत देशमुख आणि अभय जगताप यांच्यापैकी एका नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.