जळगाव शहरात जयश्री महाजनांच्या प्रचार रॅलीला उत्साहपूर्ण वातावरणात सुरूवात
ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन जयश्री महाजन यांच्या प्रचाराला प्रारंभ ; प्रभाग क्रमांक 5 मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव (5 नोव्हेंबर 2024) : विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात उतरत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई सुनील महाजन यांनी जळगाव शहर मतदारसंघातील आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. मंगळवार, 5 रोजी सकाळी प्रभाग क्रमांक 5 भाग 2 मध्ये प्रचार करण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जयश्रीताईंनी आपल्या प्रचार मोहिमेला प्रारंभ केला.
प्रचाराचे पहिले पाऊ दीक्षीतवाडीत
जळगावच्या विकासाचे स्वप्न घेवून जयश्रीताईंनी प्रचाराचे पहिले पाऊल दीक्षित वाडी परिसरात टाकले. यानंतर पांडे चौक, पारिख पार्क, विसनजी नगर, जयकिसन वाडी, आणि नवी पेठ परिसरात ठिकठिकाणी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि मतदारांना भावनिक साद घालत महाविकास आघाडीच्या मशाल या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केले. जयश्रीताईंच्या प्रचारासाठी आज मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरल्याचे दृश्य शहरात दिसून आले.
फटाके फोडून व औक्षण करून स्वागत
परिसरात फटाके फोडून तरुणांनी जल्लोषात जयश्रीताईंचे स्वागत केले तर महिलांनी औक्षण करुन जयश्रीताईंना विजयासाठी आशिर्वाद दिला. ‘जळगावला हवा बदल आणि न्याय, जयश्रीताईंशिवाय नाही पर्याय’, ‘जयश्रीताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा जोशपूर्ण घोषणांनी रस्त्यांवर उत्साह संचारला. जयश्रीताईंच्या नेतृत्त्वाने जळगाव विधानसभा निवडणुकीत शहराच्या विकासाची एक वेगळी आशा जळगावकरांच्या मनात निर्माण झाली आहे. या प्रचार दौर्याच्या माध्यमातून जयश्रीताई महाजन यांनी जळगावमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन करत, शहरातील जनतेशी संवाद साधला.
या प्रचारदौर्यात जयश्रीताई महाजन यांच्या समवेत महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.