इन्शुरन्सचा क्लेम मिळविण्यासाठी चोरीचा बनाव : व्हेपर्स फॅक्टरीचा मालकासह तिघांना बेड्या
रावेर पोलिसांची कामगिरी : चार लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त
Faking a theft to get an insurance claim : Three arrested along with the owner of a vapers factory रावेर : विमा दाव्याचा लाभ मिळवण्यासाठी निंबोल येथील व्हेपर्स फॅक्टरीच्या मालकाने चोरीचा बनाव करून रावेर पोलिसात चोरीची खोटी फिर्याद दिली मात्र पोलिसांच्या तपासात हा प्रकार उघड होताच तक्रारदार मालकासह त्याच्या दोन साथीदारांना बेड्या ठोकण्यात आल्या. चोरीस गेलेल्या चार लाख चाळीस हजारांच्या व्हेपर्स मशनरी जप्त करण्यात आल्या.
चोरीचा बनाव तपासात उघड
रावेर तालुक्यातील निंबोल येथील निरज सुनील पाटील यांच्या मालकीची नांदुरखेडा शिवारात श्रीकृष्ण केला व्हेपर्स फॅक्टरी आहे. 3 रोजी निरज पाटील यांच्या फॅक्टरीतून विविध मशिनरी चोरीस गेल्या होत्या. रावेर पोलिसांनी तक्रारीची पडताळणी केल्यानंतर तक्रार खोटी नोंदवण्यात आल्याचे उघड झाले. पोलिसांनी आरोपी निरज पाटील (24, निंबोल), उमेश सुतार (24) व कौशल जंजाळकर (19, दोघे रा.मेहतर कॉलनी, रावेर) यांना ताब्यात घेत त्यांची विचारपूस केली असता त्यांनी मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली. सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या पथकाने केली चोरी उघड
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, कॉन्स्टेबल सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, राहुल परदेशी, अमोल जाधव, विकार शेख, सुकेश तडवी, समाधान ठाकुर यांनी गुन्हाचा तपास करीत आरोपींना अटक केली.
पोलिसांनी केल्या व्हेपर्स मशनरी जप्त
दरम्यान चोरीचा बनाव करणार्या तिघा आरोपींकडून 45 हजार रुपये किंमतीची बनाना वेफर्स मशीन, 45 हजार रुपये किंमतीची पोटॅटो वेफर्स मशीन, 35 हजार रुपये किंमतीचा पोटॅटो पीलर मशीन, 48 हजार रुपये किंमतीचा ड्रायर मशीन, 15 हजार रुपये किंमतीचे पॅकींग मशीन, 17 हजार रुपये किंमतीचे एक ब्लोवर मशीन, एक लाख 45 हजार रुपये किंमतीचा कोटिंग पॅन मशीन, 90 हजार रुपये किंमतीची पॅकींग मशीन असा एकूण चार लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.