महाविकास आघाडीत तिकीट निश्चित होताच श्रीराम पाटलांचा भाजपाला ‘जय श्रीराम’ !
Shriram Patla’s ‘Jai Shriram’ to the BJP as soon as the Mahavikas Aghadi ticket is fixed! भुसावळ : रावेर लोकसभेसाठी तब्बल 26 दिवसानंतर महाविकास आघाडीला तुल्यबळ उमेदवाराच्या स्वरूपात श्रीराम पाटील गवसल्यानंतर त्यांच्या उमेदवारीवर काल पुण्यात शिक्कामोर्तब करण्यात आले. यापूर्वी श्रीराम पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा देत सोमवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. रावेर लोकसभा मतदारसंघातून श्रीराम पाटील यांना तिकीट निश्चित झाले असून मंगळवारी त्यांच्या नावाची अधिकृतरीत्या घोषणा होणार आहे.
शरद पवारांची खेळी : मराठा चेहर्याला संधी
जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या दोन्ही उमेदवारांची घोषणा केली मात्र 26 दिवस उलटूनही रावेरसाठी तूल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू होता. अॅड.रोहिणी खडसे यांच्यासह समर्थकांनी अॅड.रवींद्र पाटील यांच्या नावासाठी आग्रह धरला होता मात्र शरदचंद्र पवारांनी राजकीय गणिते हेरत श्रीराम पाटील यांची उमेदवारी पुण्यातील बैठकीत निश्चित केली आहे. दरम्या, श्रीराम पाटील यांनी गेल्या महिन्याच्या मध्यावर भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपली राजकीय कारकिर्द सुरू केली होती. आता ते थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उद्योग क्षेत्रात भरीव कार्य : शेकडो हातांना रोजगार
श्रीराम दयाराम पाटील हे 53 वर्षीय उद्योजक असून समाजातील विविध क्षेत्रात देखील त्यांनी काम केले आहे. रावेर तालुक्यातील रणगांव येथे त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांनी स्वतः रावेर येथे श्रीराम ऑटो सेंटर, श्रीराम मॅक्रोव्हिजन अकादमी, श्रीराम फाउंडेशन, श्रीराम अॅग्रो प्लास्ट इंडस्ट्रीज उभारली आहे. याशिवाय श्री साईराम प्लास्टिक आणि इरिगेशन हे रावेर, नशिराबाद, जळगाव अशा ठिकाणी त्याच्या शाखा आहेत. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यात त्यांच्या व्यापाराचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे. शेकडो हातांना त्यांनी रोजगार दिला आहे.
एक सामान्य मेकॅनिकपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज यशस्वी उद्योजकापर्यंत आहे. त्यांना घरात कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही मात्र भूमिपुत्र म्हणून गावाशी नाळ जोडलेले तसेच सामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले असे हे व्यक्तिमत्व आहे.
पॉवरबाज पवारांचा पॉवर गेम
रावेर हा भाजप नेते गिरीश महाजन व सध्या शरद पवार गटात असणारे तथा लवकरच भाजपात जाणार्या आमदार एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला आहे. गत अनेक वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने येथून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपाशी दोन हात करता येईल व तुल्यबळ लढत होण्याच्या दृष्टीने शरदचंद्र पवार यांनी पॉवर गेम खेळत मराठा समाजाचा आश्वासक चेहरा म्हणून श्रीराम पाटील यांना संधी दिली असल्याची चर्चा आहे. दरम्यान, पक्षाकडून अद्याप अधिकृतरीत्या उमेदवारी जाहीर झाली नसलीतरी उद्योजक श्रीराम पाटील यांना तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे.