भुसावळ शहरात मरीमातेच्या जयघोषात भाविकांनी ओढल्या बारागाड्या
Chariots pulled by devotees in Marimate Yatra festival in Bhusawal city भुसावळ : शहरातील सतारे भागातील ग्रामदैवत जगतजननी मरिमाता मंदिराच्या यात्रोत्सवानिमित्त मंंगळवारी सायंकाळी गुढीपाडव्या निमित्ताने मरीमातेच्या जयघोषात बारागाड्या ओढण्यात आल्या. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खेळण्यांच्या दुकानांसह संसारोपयोगी साहित्याची दुकाने थाटण्यात आली व या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल झाली. दरम्यान, यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जुने सातारा भागातील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली होती.
निर्विघ्नपणे पार पडला यात्रोत्सव
अनेक वर्षांची परंपरा जुने सतारे भागात मरीमाता यात्रोत्सवाला आहे व यानिमित्त बारागाड्या ओढल्या जातात. गेल्या दोन वर्षांपूर्वी बारागाड्यांमध्ये एकाचा बळी गेल्याने अप्रिय घटना रोखण्यासाठी यंदा समितीने व्यापक उपाययोजना केल्याने निर्विघ्नपणे यात्रोत्सव पार पडला. ग्रामदैवत मरिमाता मंदिराच्या यात्रेनिमित्ताने जळगावरोडवरील गुरुव्दारापासून मरिमाता मंदिरापर्यंत बारागाड्या ओढल्या. भगत मयुर भोळे तर बगले म्हणून दुर्गेश पाटील, राहूल पाटील होते. मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे यंदा प्रथमच यात्रेत दुकाने लावणार्या दुकानदारांना मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली. यात्रोत्सव समितीचे अध्यक्ष देवेंद्र सपकाळे, उपाध्यक्ष दुर्गेश कोळी, मंजीत कोळी, सचिव श्रेयस इंगळे, कार्याध्यक्ष राहूल सोनवणे आदींनी सहकार्य केले.