एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश ही सर्वात मोठी चूक : शरद पवारांची कबुली

माजी मंत्री सतीश पाटील यांचा दावा : सुनेच्या उमेदवारीसाठी आजारपणाचे कारण मात्र खेळी उघडी


Eknath Khadse’s entry into NCP was the biggest mistake : Sharad Pawar’s confession : Former minister Satish Patil’s claim जळगाव : आमदार एकनाथ खडसे हे भाजपाच्या वाटेवर असताना विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली असताना आता दुसरीकडे राष्ट्रवादीतील नेते माजी मंत्री सतीश अण्णा पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर त्यांना विधानपरिषदेचे आमदार केल्याची सर्वांत मोठी चूक झाल्याची कबुली खुद्द शरद पवार यांनी आपल्याजवळ दिल्याचा दावा माजी मंत्री सतीश अण्णा पाटील यांनी केला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ताकद वाढणे सोडाच राष्ट्रवादीचे झाले वाटोळे
सतीश अण्णा म्हणाले की, खडसे यांनी प्रवेश घेतल्यानंतर पक्षाची उत्तर महाराष्ट्रात ताकद वाढवून दाखवू, असे सांगितले होते मात्र राष्ट्रवादी पक्ष वाढला तर नाहीच उलट राष्ट्रवादी पक्षाचे वाटोळे झाल्याची टीका पाटील यांनी केली. राष्ट्रवादीकडून रावेर मतदारसंघात एकनाथ खडसे यांचे उमेदवारीसाठी नाव निश्चित करण्यात आले मात्र ऐनवेळी त्यांनी आजारपणाचे कारण पुढे केले त्यामुळे उमेदवार शोधताना पक्षाची तारांबळ उडाली व अखेर श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. सुनेच्या उमेदवारीसाठी खडसे यांनी आपल्याला आजारपणाचे कारण दिले व त्यांची ही खेळी आता उघडी पडल्याचे पाटील म्हणाले.

एखाद्या कार्यकर्त्याला संधी दिली असतीतर ताकद वाढली असती !
माजी मंत्री सतीश पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे हे आपल्या स्वार्थासाठी राष्ट्रवादीमध्ये येत असल्याचे मी शरद पवार यांना त्यावेळी सांगितले होते मात्र आता त्यांनी पुण्यातील बैठकीत खडसेंना पक्षात घेतल्याची चूक झाल्याचे सांगत त्यावेळी मी तुमचे ऐकायला हवे होते, अशी कबुली पवारांनी दिल्याचा दावा सतीश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. खडसे यांच्याऐवजी एखाद्या होतकरू आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी दिली असती तर आज जिल्ह्यात पक्षाची ताकद चार पटींनी वाढली असती, शिवाय रावेरसाठी उमेदवार शोधण्याचा जो त्रास झाला तोही झाला नसता, असेही सतीश पाटील म्हणाले.

तर लोकांमध्ये चुकीचा मेसेज जाईल
एकनाथ खडसे भाजपामध्ये जात असताना रोहिणी खडसे या राष्ट्रवादीमध्येच राहत आहेत. त्यांच्याकडे आपण महिला प्रदेशाध्यक्ष कायम ठेवले तर लोकांमध्ये चुकीचा मेसेज जाईल, असेही आपण पवारांना सांगितल्याचे सतीश पाटील म्हणाले. रोहिणी खडसे यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी तन-मन-धनाने निवडणुकीत काम करावे आणि तसे झाले आणि रिझल्ट दाखविला तरच त्यांचा विधानसभेसाठी विचार करावा, असे पवारांना सुचविल्याचे सतीश पाटील म्हणाले.

गिरीश महाजनांवरही सडकून टिका
भाजपा नेते गिरीश महाजन हे सध्या हवेत आहेत. गेल्या दहा वर्षात त्यांनी जिल्ह्यासाठी काय केले हे सांगायला पाहिजे. पाच लाखांनी आपला उमेदवार निवडून येईल असे ते ओव्हर कॉन्फिडन्सने सांगत आहेत. याचा अर्थ त्यांनी मतांची काही जुळवा-जुळव केली आहे की पाच लाख मतांचा घोटाळा केला आहे हे लवकरच स्पष्ट होईल. तुमची इतकी चांगली परिस्थिती होती तर मग सीटिंग खासदार तुम्हाला का सोडून गेले? याचा विचारही त्यांनी करायला पाहिजे, अशी टीका सतीश पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली.


कॉपी करू नका.