देशातील हुकूमशाही सरकारला आता जनताच घरी बसवणार ! : जामनेरात शरद पवारांचा हल्लाबोल

0

जामनेर : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेवर हल्ला करण्याचे काम आता मोदी सरकार करीत असल्याचा आरोप जामनेर येथे आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्यात माजी कृषि मंत्री शरद पवार यांनी केला. नरेंद्र मोदींनी देशातील शेतकर्‍यांसाठी काहीही केले नाही मात्र प्रश्न मला ते विचारत आहेत, असा टोलादेखील शरद पवार यांनी लगावला. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्या प्रचारार्थ जामनेरात रविवारी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

यांची विचार मंचावर उपस्थिती
विचार मंचावर माजी मंत्री सतीशअण्णा पाटील, प्रदेश उपाध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्या पाटील, माजी खासदार ईश्वरलाल जैन, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी शिवसेना नेते संजय सावंत, उमेदवार श्रीराम पाटील आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

जळगाव जिल्ह्यात एकही नवीन उद्योग नाही
राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार म्हणाले की, जळगाव जिल्यात गेल्या दहा वर्षात एकही नवीन उद्योग आला नाही, खान्देशासह जिल्ह्यात टेक्स टाईल पार्क आले नाहीत, केळी उत्पादक शेतकर्‍यांना केळी पीक विम्याचा लाभ मिळाला नाही शिवाय केळीचे अनुदानदेखील मिळाले नाही. सरकारकडून हुकूमशाही सुरू असून या हुकूमशाही सरकारला आता जनताच घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात त्यांनी केला. नरेंद्र मोदींनी देशातील शेतकर्‍यांसाठी काही केले नाही अन् प्रश्न मला विचारत आहेत, असा टोलादेखील शरद पवार यांनी लगावला. महागाईचा आगडोंब उसळला आहे, जनता हवालदील झाली आहे मात्र आता जनताच हुकूमशाही सरकारला धडा शिकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माजी आमदार संतोष चौधरी म्हणाले : दादागिरीला चोख उत्तर देणार
राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांनी दिलेल्या शब्दानंतर भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरींचे बंड शमले. जामनेरच्या रविवारी झालेल्या मेळाव्यात त्यांनी श्रीराम पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार केला. आपल्या आक्रमक शैलीत चौधरी म्हणाले की, मी चार फार्म घेवून आलो म्हणून विविध चर्चा झाल्या मात्र ते फार्म मी शरद पवार पक्षाच्या नावाने आणले आहेत. मी जीवनात कधीही पवार साहेबांच्या शब्दाबाहेर जाणार नाही याची खात्री देतो. साहेबांना अनेक लोक सोडून गेले आहेत शिवाय आमच्यासोबत अनेकांनी दगा केला मात्र त्याचे उत्तर आम्ही योग्य वेळ आल्यावर देवू.

दादागिरीला चोख उत्तर देएणार
चौधरी म्हणाले की, साहेबांनी आणखी दोन सभा साहेबांनी आम्हाला द्याव्यात. मनात खूप बॅगलॉक साचला आहे त्यामुळे आम्हाला भरपूर काही बोलायचे आहे. भुसावळ, मुक्ताईनगर, जामनेर मतदारसंघात ताकद दाखवून देवू, श्रीराम पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून लढू, जीवाचे रान करू व 13 मे पर्यंत झोपणार नाही, असा शब्दही त्यांनी दिला. श्रीराम पाटील यांच्या बाजूने जनता-जनार्दन आहे. आपल्याला सोडून गेलेल्यांना जनताच आता त्यांची जागा दाखवेल, असेही ते म्हणाले. निवडणुकीपर्यंत दबाव येईल, दादागिरी करण्याचे प्रयत्न होतील मात्र जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
माजी कृषी मंत्री शरद पवार, माजी मंत्री सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्या पाटील, अ‍ॅड.रोहिणी खडसे, संजय सावंत, ईश्वरलाल जैन, उमेदवार श्रीराम पाटील आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.


कॉपी करू नका.