सुट्टीमध्ये गावाला जाताना व्हॉटसअ‍ॅप स्टेटसवर सांगताय कशाला ?

पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे : मौल्यवान ऐवज लॉकरमध्ये ठेवा

0

Why are you saying on WhatsApp status while going to the village during vacation? भुसावळ : उन्हाळी सुट्यांमुळे बाहेरगावी पर्यटनाला जाताना आपण व्हॉटस्अ‍ॅप स्टेटस्वर ही बाब कौतुकाने टाकतो मात्र हेच कौतूक आपल्याला ‘घर साफ’ झाल्यावर महाग पडते त्यामुळे बाहेरगावी जाताना कुणाला सांगण्याची गरज काय ? असा प्रश्न भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी केला. बंद घरांनाच चोरट्यांकडून सहसा टार्गेट केले जाते व चोरटे दिवसा टेहळणी करून बंद घरांचा अंदाज बांधतात त्यामुळे बाहेरगावी जाताना जवळच्या पोलीस ठाण्याला सूचित करा, स्टेटसला अशी कुठलीही माहिती टाकू नका जेणेकरून कुणालाही तुम्ही बाहेरगावी जात असल्याची माहिती मिळेल शिवाय घरातील मौल्यवान दागदागिणे व जास्तीची रोकड बँकेत ठेवा, असे आवाहनही निरीक्षक रणदिवे यांनी केले. भुसावळ शहरातील यावल रोडवरील साईचंद्र नगरात वाढत्या चोर्‍यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कॉर्नर मिटींग घेत नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
निरीक्षक रणदिवे म्हणाले की, हल्ली नागरिक बाहेरगावी जाताना स्टेटसवर वा सोशल मिडीयावर माहिती शेअर करतात व हीच माहिती चोरटे हेरत तुमचे घर साफ करतात त्यामुळे नागरिकांनी दिखावूपणा टाळावा व गावाला जाताना व्हॉटस्अ‍ॅप स्टेटस व सोशल मिडीयावर माहिती टाकू नये, असे आवाहन त्यांनी केले. बाहेरगावी जाताना घराबाहेरील लाईट सुरू ठेवावा तसेच घरातील मौल्यवान दागदागिणे व रोकड बँकेतील लॉकरमध्ये ठेवावी अथवा विश्वासू नातेवाईकांकडे ठेवावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले. घराला सेप्टी डोअर तसेच आतमध्येदेखील मजबूत दरवाजा व मजबूत कुलूप असावे, असेदेखील त्यांनी सांगितले.

वॉचमन ठेवा, सीसीटीव्ही लावा
निरीक्षक रणदिवे म्हणाले की, लाखो रुपयांची आपण घरे बांधतो मात्र सुरक्षिततेबाबत आपली सर्व मदार पोलिसांवरच असते. कॉलनी भागात वॉचमन ठेवणे सहज शक्य आहे शिवाय सीसीटीव्ही लावता आल्यास त्यातून अप्रिय घटनांना आळा बसेल व दुर्दैवाने काही अप्रिल घडल्यास त्यातून चोरट्यांचा शोध घेणे शक्य होईल म्हणून नागरिकांनी एकत्र येत याबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अल्पवयीन मुलांच्या हाती आपण दुचाकी दिल्याने अप्रिय घटना घडतात व घडू शकतात म्हणून पालकांनी सजग होवून पाल्यांना लायसन्स मिळेपर्यंत वाहन चालवण्यास देवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. कॉलनी भागात दिवसभरात अनोळखी व्यक्ती, फेरीवाले, विक्रेते आल्यास त्यांना हटकावे शिवाय त्यांना थेट घरात प्रवेश देवू नये, असेदेखील त्यांनी सांगितले.

‘शेजारीच पहारेकरी : वाद सोडा नाते जोडा’
शेजारीच हा खरा पहारेकरी असतो मात्र छोट्या-मोठ्या गोष्टीतून झालेल्या वादातून आपण संबंध खराब करतो व अनेकदा पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागते मात्र वाद सोडा व नाते जोडा, असे आवाहनी निरीक्षक रणदिवे यांनी केले. दूरवर राहणार्‍या नातेवाईकांपेक्षा शेजार्‍याशी प्रेमाने वागा, झाले-गेले विसरा कारण तुमच्या सुख-दुखाःत तेच धावतील व बाहेरगावी गेल्यानंतरदेखील तेच तुमच्या घराचे पहारेकरी असतील त्यामुळे अप्रिय घटनाही टळतील, असे निरीक्षक रणदिवे म्हणाले.

यांनी घेतले परिश्रम
कॉर्नर मिटींग यशस्वीतेसाठी अजयकुमार डागोर, रेल्वेचे तिकीट निरीक्षक आर.के.सिंग, रेल्वे सीएचआय पंकज गुप्ता व प्रमोद सोनी, ज्येष्ठ नागरिक खेमचंद बर्‍हाटे, सुधीर फिरके, हवालदार आशा तडवी, निता पाटील, मनीषा साळी, श्रद्धा गुप्ता, समाधान पाटील, अशोक अडकमोल, योजना पाटील, साईचंद्र नगरातील सोसायटीतील सर्व रहिवाशांनी सहकार्य केले.


कॉपी करू नका.