मोदींचे प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात येणे हा तर मराठा समाजाचा विजय : मनोज जरांगे-पाटील

0

छत्रपती संभाजी नगर : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा महायुतीला डिवचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात येणे म्हणजे हा तर मराठा समाजाचा विजय असल्याचे ते म्हणाले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

मराठा समाजाच्या एकीची भीती
महायुतीकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या सभा होत आहेत. यावर मनोज जरांगे यांनी टीका केली आहे. “मोदी साहेबांना इकडे लक्ष देण्याची गरज नव्हती. मोदी साहेब शक्यतो स्वतःचं चिन्ह सोडून कधीच दुसर्‍याच्या प्रचाराला गेले नाहीत. मराठा समाजाच्या एकीची त्यांना भीती निर्माण झाली आहे. हाच मराठ्यांचा विजय आहे की, त्यांना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावे लागत आहे”, असे जरांगे पाटील म्हणाले.

सहानुभूती मिळवण्यासाठी कट
सांगलीत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीला अज्ञाताकडून चपलांचा हार घालण्यात आला आहे. यावर जरांगे म्हणाले, “असे कुणीच कुणाशी करू नये. प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. काही जण असे आहेत की, ते स्वतः करतात आणि मराठ्यांवर नाव घालत आहेत. काही जण सहानुभूती मिळवण्यासाठी असे कटकारस्थान करत आहेत. मराठा असो किंवा ओबीसी असो असे कुणी नाही केलं पाहिजे,”, असे जरांगे म्हणाले.

मराठ्यांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. मराठा एकटे सर्वांचे शत्रू आहेत का? ओबीसी मतं मिळवायला काही ठिकाणी स्टंट होत आहेत. हा देखील त्यातीलच एक प्रकार असू शकतो. त्यांनी काही ठिकाणी स्टंट करून सहानुभूती मिळवायला नको”, असे जरांगे यांनी म्हटले आहे.


कॉपी करू नका.