सुट्यांमध्ये बाहेरगावी जाताना पोलिसांना द्या माहिती : पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे

0

Inform police while going out during holidays: Deputy Superintendent of Police Krishnat Pingle भुसावळ : शाळांना उन्हाळी सुट्या लागल्याने सुटीच्या दिवशी नागरिक आपल्या कुटुंबासह लग्न कार्यासाठी किंवा पर्यटन वा नातलगांकडे काही दिवस जातात. या काळात त्यांचे घर बंद असते. अशा वेळी आपल्या गैरहजेरीत घरात चोरी होवू नये यासाठी बाहेरगावी गेल्याची माहिती शेजार्‍यांना तसेच पोलिसांना द्यावी. तसेच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी केले आहे.

मोबाईलवर स्टेटस न ठेवण्याचे आवाहन
सुटीच्या काळात अनेकजण बाहेरगावी जाण्याचे नियोजन करतात मात्र हे करतांना ते शेजारच्यांना सांगत नाहीत तसेच पोलिसांना देखील माहिती देत नाहीत. विशेष म्हणजे काहीजण आपण बाहेरगावी चाललो आहोत याचे स्टेटस मोबाईलवर ठेवतात. यातून चोरी, घरफोड्या करणार्‍यांचे फावते आणि मग बंद घरे शोधून घरात कोणी नसल्याची संधी साधत घरे फोडतात. पार्श्वभूमीवर घर बंद करून बाहेर जाणार्‍यांनी सुचनांचे पालन करावे, अशी अपेक्षा पोलिसांनी केली आहे.

संशयित दिसल्यास पोलिसांना कळवा
ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. नागरिकांनी बाहेरगावी जाताना शेजारच्या नागरिकांना माहिती देऊन जावे व एकमेकांचे फोन नंबर्स माहिती करून घ्यावेत. घरात जास्त पैसे किंवा सोन्याचे दागिने ठेवू नये तसेच अंगावर दागिने घालू नयेत. ते बँकेत सुरक्षीत लॉकरमध्ये ठेवावेत. दिवसा अनोळखी व्यक्ती परिसरात दिसल्यास पोलिसांना त्याची माहिती द्यावी, असेही पोलीस उपअधीक्षक पिंगळे म्हणाले.

दागिणे घालून बाजारात जाऊ नये
बाजारात खरेदीसाठी जाताना महिलांनी अंगावरील सोने व मौल्यवान वस्तू यांची योग्यप्रकारे काळजी घ्यावी. सोनसाखळी चोरांपासून सावध रहावे. एटीएम व व बँकेतून पैसे काढल्यानंतर पैसे सुरक्षित ठेवावेत. पैसे कुणी हिसकावून अथवा बहाणा करून नेणार नाही याची दक्षता घ्यावी. आपले वाहन सुरक्षीत ठिकाणी पार्क करावे. ज्या ठिकाणी पार्किंग सुविधा व सी.सी.टी.व्ही. कॅमेरे आहेत अशा ठिकाणी फिरताना दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. कोणताही आर्थिक व्यवहार किंवा इतर खरेदी-विक्री मधून मिळालेले पैसे घरात न ठेवता तत्काळ बँकेत जमा करावे, महिलांनी बाजारामध्ये जाताना, गर्दीच्या ठिकाणी जाताना अथवा कार्यक्रमाला जाताना कमीत-कमी दागिने घालून जावे, असे आवाहनही पोलीस उपअधीक्षक पिंगळे यांनी केले आहे.

 


कॉपी करू नका.