ठेवीच्या रकमांना टाळाटाळ : भुसावळ तालुक्यात ठेवीदारांचा मतदानावर बहिष्कार

0

भुसावळ : शहरातील विविध पतंसंस्थामध्ये ठेवीच्या रक्कमा ठेवण्यात आल्यानंतर मुदत संपल्यावर सुध्दा त्या रकमा परत मिळत नाहीत शिवाय शासनाचे उंबरठे झिजवून उपयोग होत नसल्याने ठेवीदारांकडून लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे लेखी निवेदन ठेवीदारांनी प्रांताधिकारी यांना दिले आहे.

पतसंस्था चालकांवर कारवाई नसल्याने ठेवीदारांचा बहिष्कार
ठेवीदारांनी त्यांच्या ठेवीच्या रक्कमा पतसंस्थामध्ये ठेवल्या असून 2007 पासून मुदत संपल्यावर सुध्दा पतसंस्थांकडून ठेवीच्या रक्कमा परत मिळत नसल्याने खान्देश ठेवीदार कृती समितीतर्फे ठेवीदारांनी शुक्रवारी डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात बैठक घेतली. त्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला. शुक्रवारीच ठेवीदारांनी निवेदन तयार करून प्रांताधिकारी यांना मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले. पतसंस्थामध्ये वारंवार जाऊन सुध्दा संस्था चालक ठेवीदारांचे पैसे देत नाही, तर काही पतसंस्था बंद अवस्थेत आहे. यामुळे ठेवीदारांनी ठेवीच्या रक्कमा कोणाकडे मागायच्या ? असा प्रश्न ठेवीदारांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यातील 903 पतसंस्थापैकी 80 टक्के पतसंस्था या त्यांच्या पत्यावर नाहीत, आजारपणात सुध्दा ठेवीच्या रक्कमा ठेवीदारांना मिळाल्या नाही त्यामुळे दोन हजार 765 ठेवीदारांचे मृत्यू झाला आहे. यामुळे लोकशाहीत सुध्दा कायद्याने पतसंस्था चालकांवर काहीही कारवाई होत नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील यांनी कळविले आहे.


कॉपी करू नका.