चिनावलला पत्रकारावर अज्ञात हल्लेखोराकडून प्राणघातक हल्ला

0

Chinawala journalist assaulted by unknown assailants सावदा : येथून जवळच असलेल्या चिनावल येथे आवाज परिवर्तनाचा या वृत्तपत्राचे संपादक तथा वंचित आघाडीचे कार्यकर्ते आत्माराम तायडे यांच्यावर गुरुवार, 2 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या संशयीतांनी हल्ला केला. याप्रकरणी शुक्रवारी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तायडे हे चारचाकी सुझुकी इको (एम.एच.19 ए.एक्स 1430) ने परत येत असताना चिनावलभकोचूर रस्त्यावरील स्मशानभूमी जवळ त्यांच्यावर अज्ञात दुचाकीस्वारांनी प्राणघातक हल्ला केला. यात ते जखमी झाले.

पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांचा ठिय्या
आत्माराम तायडे या वंचितच्या पदाधिकार्‍यावर प्राणघातक हल्ला झाल्याने आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शमिभा पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी सावदा येथील पोलीस स्थानकात ठिय्या मांडला. सध्या निवडणुकीसाठी पोलिसांची व्यस्तता लक्षात घेऊन याच्या तपासासाठी वेळ मिळावा, अशी मागणी पोलिसांनी केली. कार्यवाहीचे पोलिसांनी आश्वासन दिले.

दरम्यान, शनिवार, 4 रोजी सावदा शहरातील पत्रकारांतर्फे आवाज परिवर्तनाचा याचे संपादक आत्माराम तायडे यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला व हल्लेखोरांवर कारवाईबाबत सावदा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. यावेळी सावदा पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरदास बोचरे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी पत्रकार श्याम पाटील, युसूफ शहा, राजेश चौधरी, दीपक श्रावगे, जितेंद्र कुलकर्णी, फरीद शेख, रवींद्र हिवरकर, शेख साजीद यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.


कॉपी करू नका.