रामदेववाडी अपघातात चौघांचा मृत्यू : दोघा आरोपींना अटक


जळगाव : जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथील चौघांचा बळी घेणार्‍या अपघात प्रकरणात आरोपी अर्णव कौल आणि अखिलेश पवार यांना जनतेचा रोष वाढताच पोलिसांनी मुंबईहून अटक केली. आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

कारच्या धडकेने झाला होता चौघांचा मृत्यू
जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथील रहिवासी असलेल्या चौघांना भरधाव कारने उडविल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी संतप्त होऊन रास्ता रोको आंदोलन देखील केले होते. तब्बल 17 दिवस उलटून गेल्यावर देखील या तरुणांवर कारवाई न झाल्याने पोलीस प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला होता.

रुग्णालयातून दोघांना अटक
अपघात प्रकरणी कारमधील अर्णव अभिषेक कौल आणि अखिलेश संजय पवार या दोघांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबई येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी जळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी या दोघांना जळगाव न्यायालयात सादर करण्यात आले. याप्रसंगी दोन्ही संशयितांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ज्ञ प्रकाश पाटील, अकिल ईस्माईल आणि सागर चित्रे यांनी बाजू मांडली. त्यांनी आपल्या युक्तीवादात अर्णव कौल आणि अखिलेश पवार यांच्या सोबत कारमध्ये अजून दोन जण असल्याकडे लक्ष वेधतांनाच या दोघांनी कार चालविल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे सांगितले. यामुळे या प्रकरणात कलम 304 न लावता कलम-279 लावावे, असा युक्तीवाद देखील केला.

आरोपींना चार दिवसांची कोठडी
सरकारी वकील स्वाती निकम यांनी हा युक्तीवाद खोडून काढतांनाच या प्रकरणातील गांभीर्य हे न्यायाधीशांच्या लक्षात आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधिशांनी अर्णव कौल आणि अखिलेश पवार या दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता या दोघांना 27 मे रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


कॉपी करू नका.