भुसावळातील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश स्कूलला जाण्याचा मार्ग खडतर
पावसाळ्यात विद्यार्थ्यांचे हाल : पालिकेने दखल घेण्याची अपेक्षा
भुसावळ : शहरातील महेश नगर भागातील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मेडियम स्कूलकडे जाणार्या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांचे शाळेत जाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्याला डांबरीकरणाची प्रतीक्षा आहे. शहरात कोट्यवधींची विकासकामे सुरू असताना दुसरीकडे मात्र शिक्षण घेण्यासाठी जाणार्या विद्यार्थ्यांसह पालकांना अनंत हाल-अपेष्टा सोसाव्या लागत आहे. पालिका प्रशासन व संबंधित भागातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून रस्त्याची दुरवस्था थांबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दहा वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा
शहरातील महेश नगर भागात डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मेडियम स्कूल आहे. या स्कूलला जाण्यासाठी असलेल्या रस्ता मातीचा असल्याने पावसाळ्यात या रस्त्यावरून विद्यार्थी घसरून पडतात तसेच दुचाकीलादेखील दररोज किरकोळ अपघात होत आहेत. या रस्त्याचे डांबरीकरण झाल्यास विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पालिका हद्दीत येणार्या या रस्त्याची दुरवस्था थांबण्यासाठी पालिका प्रशासनाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हजारो विद्यार्थी दररोज या रस्त्यावरून पायी तसेच वाहनांनी प्रवास करतात मात्र पावसाळ्यात सर्वाधिक हाल विद्यार्थी तसेच पालकांचे होतात. मातीच्या रस्त्यावर चिखल निर्माण झाल्याने वाहने घसरतात शिवाय विद्यार्थीदेखील पाय घसरून पडल्याने किरकोळ जखमी होत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था कायम आहे.
