शेख हसीना यांच्या अडचणी वाढल्या : अमेरिकेकडून व्हिसा रद्द
Bangladesh Sheikh Hasina नवी दिल्ली (6 ऑगस्ट 2024) : बांग्लादेशात झालेल्या दंगल व हिंसाचारानंतर पंतप्रधान पदाचा राजीनामा देत शेख हसीना यांना देश सोडावा लागला मात्र त्यानंतरही त्यांच्या अडचणी कमी व्हायला तयार नाहीत. सध्या त्या भारतातील हिंडन विमानतळावरील गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी आहेत. युकेने त्यांना आश्रय देण्याबाबात अद्याप कुठलाही निर्णय घेतला नसताना दुसरीकडे अमेरिकेने त्यांचा यूएस व्हिसा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.
युकेतील विनंती प्रलंबित
ब्रिटनच्या गृहविभागाच्या म्हणण्यानुसार, शेख हसीना ज्या देशात आधी पोहचतील, त्या देशाकडे आश्रयासाठी बोलणे केले पाहिजे. सुरक्षेचा हा सर्वात वेगवान मार्ग असल्याचे ब्रिटनचे मत आहे. या कारणास्तव हसीना यांची यूकेमध्ये आश्रयाची विनंती अद्याप प्रलंबित आहे. मात्र, हसीना यांची बहीण रेहाना आणि भाची ट्युलिप सिद्दीकी यांच्याकडे युकेचे नागरिकत्व असल्यामुळे त्यांना आश्रय मिळू शकतो.
अमेरिकेने व्हिसा रद्द केला
शेख हसीना यांच्यासमोर युकेनंतर अमेरिकेला जाण्याचा पर्याय होता, मात्र अमेरिकेने त्यांचा व्हिसा रद्द केला. आता अमेरिकेत आश्रय घेण्याचा मार्गही बंद झाला आहे. शेख हसीना आणखी काही दिवस भारतात राहणार आहेत. यावर भारत सरकारनेही स्पष्टोक्ती दिली आहे. शेख हसीना यांना भारतात राहायचे असेल, तर राहू शकतात, त्यांनी स्वतः निर्णय घ्यावा. भारत सरकारने त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.