प्रत्येक शिक्षक हा आदर्श शिक्षकच ! : आमदार संजय सावकारे

भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे शहर व तालुक्यातील शिक्षकांचा सन्मान

0

भुसावळ (14 सप्टेंबर 2024) : प्रत्येक शाळेतील शिक्षक हे आदर्श शिक्षकच असतात त्यामुळे एखाद्या शाळेतील एक-दोन शिक्षकांना निवडून त्यांना पुरस्कार देण्याऐवजी प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे शहर व तालुक्यातील सर्वच शिक्षकांचा करण्यात आलेल्या सहृदय सन्मान सोहळा निश्चितच कौतुकास्पद उपक्रम असल्याचे प्रतिपादन भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी येथे केले. शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात शिक्षक दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, 12 रोजी सायंकाळी पाच वाजता शहर व तालुक्यातील एक हजारावर शिक्षकांचा ‘गुणगौरव गुरूजणांचा’ सोहळ्यात आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला. याप्रसंगी आमदार बोलत होते.

सर्वच शिक्षक आदर्श : तुलना करणे अयोग्य
आमदार संजय सावकारे म्हणाले की, शिक्षक हे विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवतात व त्यांना चांगला नागरिक म्हणून घडविण्याचे अवघड कार्य करतात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी ते आयुष्यभर झटतात. मर्यादीत लोकांनाच पुरस्कार द्यावयाचा असल्याची प्रथा आहे मात्र प्रत्येक शिक्षक हा आदर्शच असल्याचे आमदार म्हणाले. शिक्षक हा देखील प्रथम विद्यार्थीच असतो व शिक्षकांच्या हातून चांगले कार्य घडावे तसेच सांघिक भावनेने शिक्षकांनी कार्य करून शाळांची गुणवत्ता अधिकाधिक वाढवावी, अशी अपेक्षा आमदारांनी यावेळी व्यक्त केली. आपल्या जडण-घडणीत आई-वडिलांसह शिक्षकांचाही मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षकांकडून धडे
भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी मार्गदर्शनात आजवर मिळालेल्या यशामागे शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे सांगितले. पोलीस खात्यात येण्यापूर्वी आपण कोल्हापूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होतो व त्या जोरावरच पोलीस उपनिरीक्षक ते उपअधीक्षक पदार्यंत मजल गाठल्याचे त्यांनी नम्रपणे नमूद केले. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षकांकडून काहीना काही शिकायला मिळते, असेही पोलीस उपअधीक्षक पिंगळे म्हणाले. शिक्षकांनी मुलांच्या स्वप्नांना आकार द्यावा, पंखात बळ येण्याची प्रेरणा द्यावी, शिक्षकांनी नेहमी सकारात्मकपणे विचार करावा, असेही ते म्हणाले.

प्रत्येक शिक्षकाचा सन्मान व्हावा हा उद्देश ः रजनी सावकारे
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी प्रास्ताकिात प्रत्येक शिक्षक हा आदर्श शिक्षक असून प्रत्येकाचा सन्मान व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन आमदारांच्या सहकार्यातून करण्यात आल्याचे सांगितले. शिक्षक केवळ मार्गदर्शक नसून आपल्या जीवनातील प्रेरणास्त्रोत आहेत शिवाय ते शाळेत पाठ्यपुस्तकापुरतेच मर्यादित ज्ञान न देता जीवनातील शहाणपण, नैतिकता आणि आदर्श शिकवत असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत प्रतिष्ठा मंडळाने हा उपक्रम राबवला व यापुढे राबवण्यात येईल, अशी ग्वाही रजनी सावकारे यांनी यावेळी दिली.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संजय सावकारे, भुसावळ पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे, जळगाव डाएटचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे, शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख, मुख्याध्यापक संघ तालुकाध्यक्ष जे.पी.सपकाळे, डॉ.संगीता बियाणी आदींची उपस्थिती होती.

यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
सूत्रसंचालन राजेश्री देशमुख यांनी करून आभारही मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक प्रदीप साखरे, बी.एन.पाटील, राजेंद्र कुलकर्णी, संजीव भटकर, अनिता आंबेकर, वैशाली सैतवाल, सोनल महाजन, राजश्री बादशाह, वैशाली भगत, अलका भटकर, सुनंदा भारूडे, मनीषा काकडे, वंदना सोनार, प्रीती पाटील, सरला सावकारे आदींनी परिश्रम घेतले.


कॉपी करू नका.