साकेगावातील 26 वर्षीय विवाहितेच्या हत्येमागे आले ‘हे’ धक्कादायक कारण समोर
आरोपी तरुणाला अटक : विवाहितेला वाचवण्यासाठी गेलेला सुरक्षा रक्षकही जखमी
भुसावळ (27 सप्टेंबर 2024) : 26 वर्षीय विवाहितेसोबत असलेल्या अनैतिक संबंधात झालेल्या वितृष्ट व वादानंतर 28 वर्षीय तरुणाने विवाहितेवर चाकूने हल्ला केल्याने विवाहितेचा मृत्यू ओढवला. ही धक्कादायक साकेगाव येथे बुधवार, 25 सप्टेंबरच्या रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. सोनाली महेंद्र कोळी (26, साकेगाव) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. खून प्रकरणी सागर रमेश कोळी (28, साकेगाव) या संशयीताला अटक करण्यात आली.
अनैतिक संबंधातील वादानंतर महिलेची हत्या
भुसावळ तालुका पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, विवाहिता सोनाली कोळी ही भवानी नगरात दोन मुले व मुलीसह वास्तव्यास होती. कौटूंबिक कारणामुळे विवाहितेचे पती महेश कोळी गावातच राहणार्या आईकडे वास्तव्यास असून ते मजुरी काम करतात. विवाहिता सोनाली कोळी यांच्याकडे संशयीत सागर कोळी यांचे नियमित येणे-जाणे होते व बुधवारी रात्री 11.30 वाजता संशयीत सागर कोळी हे विवाहितेकडे आल्यानंतर त्यांच्यात वाद उफाळला. शाब्दीक वाद वाढत गेल्यानंतर संशयीत कोळी याने धारदार चाकूने महिलेच्या पोटावर, पाठीवर, उजव्या हातावर वार केला व वादाचा आवाज ऐकून शेजारील रहिवासी सुरक्षा रक्षक विनोद सुभाष कुंभार धावून आले व वाद सोडवताना त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला चाकू लागल्याने जखम झाली. यावेळी संशयीत सागर कोळी याने तू आमच्या मध्ये पडू नकोस, नाही तर तुलाही मारून टाकेल, अशी धमकी दिली. चाकूचे वारमुळे रक्तस्त्राव होवून विवाहितेचा जागीच मृत्यू झाला.

भुसावळ तालुका पोलिसांची धाव
खुनाची माहिती मिळताच भुसावळ पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, भुसावळ तालुका पोलीस निरीक्षक महेश गायकवाड व तालुका पोलिसांनी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. संशयीत आरोपी सागर कोळी यास अटक करण्यात आली तसेच त्याच्याकडून धारदार चाकू जप्त करण्यात आला. सुरक्षा रक्षक विनोद सुभाष कुंभार यांच्या फिर्यादीवरून आरोपी सागर कोळी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक जनार्दन खंडेराव करीत आहेत.
