नागपूर हादरले : पतसंस्था संचालकांसह एकाच कुटूंबातील चौघांची आत्महत्या
नागपूर (03 ऑक्टोबर 2024) : नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथे तिघांची हत्या करीत एकाने गळफास घेतला. ही घटना बुधवारी घडली. मृतांमध्ये विजय मधुकर पाचोरी (62), त्यांच्या पत्नी माला विजय पाचोरी (54), गणेश पाचोरी (38) व लहान दीपक पाचोरी (36) अशी मृतांची नावे आहेत. मयत विजय पाचोरी हे दिवाळखोर मातृनिधी इंडिया प्रा.लि.पतसंस्थेचे संस्थापक आहेत. नागरिकांकडून पैशांसाठी सुरू असलेल्या तगाद्याने कुटूंबाने हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
पोलिसांकडून तपासाला सुरूवात
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मोवाड येथील वॉर्ड क्र 5 मधील खोब्रागडे यांच्या कडे पाचोरी कुटुंब भाड्याने राहत होते. सकाळी शेजार्याना हा प्रकार लक्षात आला. घटनास्थळी नरखेड पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई करीत आहे.

मृतकापैकी एक आर्थिक घोटाळ्यातील आरोपी
सेवानिवृत्त शिक्षकाच्या दोन मुलांपैकी एक मुलगा मध्यप्रदेशातील पांढूर्णा येथे आर्थिक घोटाळ्यातील आरोपी होता आणि काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. कुटुंबात आर्थिक तंगीमुळे वाद वाढला असावा, वाद अधिक विकोपाला गेला असावा आणि त्यातूनच घरातील सर्वांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले असावे असं सांगण्यात येत आहे. वडिलांनीच तिघांची हत्या केली असावी आणि नंतर स्वतः गळफास घेतला असावा असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास चालू आहे.
गुन्हा दाखल होवून अटक झाल्याने टोकाचे पाऊल
दिवाळखोर मातृनिधी इंडिया प्रा.लि.पतसंस्थेचे संस्थापक विजय पाचोरी यांनी पत्नी व दोन मुलांसह आत्महत्या केल्यामागे लोकांनी पैशांसाठी तगादा लावल्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. मृत गणेशच्या खिशात सुसाईड नोट आढळली असून पांढुर्णा पोलिसात गुन्हा दाखल होवून अटक झाल्याने त्यामुळे आत्महत्या केल्याचे चौघांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.
