ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर ; कार्यक्रम रद्द
A day of mourning has been announced in the state in memory of veteran industrialist Ratan Tata ; Program cancelled मुंबई (10 ऑक्टोबर 2024) : पद्मविभूषण व ज्येष्ठ ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात गुरवारी एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
दुपारी होणार अंत्यसंस्कार
रतन टाटा यांचे पार्थिव सामान्य नागरिकांना अंत्यदर्शन घेण्यासाठी एनसीपीएमध्ये आणण्यात आले आहे. शासकीय इतमामात टाटा यांच्यावर गुरुवारी दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार केले जातील. रतन टाटांच्या अंत्यविधीला राज्यातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच केंद्रातून गृहमंत्री अमित शाह हे येणार असल्याचे वृत्त आहे. भारत सरकारकडून शाह हे रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण करतील, असे सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आसियान-भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी लाओस दौर्यावर निघाले आहेत. यामुळे ते उपस्थित राहू शकणार नाहीत. मोदी यांनी रतन टाटा यांचे भाऊ नोएल टाटा यांचे फोनवरून सांत्वन केले.


वयाच्या 86 व्या वर्षी निरोप
रतन टाटा यांना सोमवारी पहाटे प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. बुधवारी उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूकडून सर्व शर्तीचे प्रयत्न सुरु होते मात्र रात्री उशिरा त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. रात्री उशिरा टाटा सन्स चे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी ही बातमी अधिकृतरित्या जाहीर केली.
