हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती करा मात्र भावनिक नव्हे व्यावहारीक विचार करून !


अमोल महाजन, नाशिक
नाशिक :
प्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते की त्याचे स्वतःचे घर असावे. त्या स्वप्नासाठी तो रात्रंदिवस प्रयत्न करतो, मेहनत घेतो आणि काबाड कष्ट करतो आणि अथक प्रयत्नातून एक दिवस असा उजाडतो ज्या दिवशी तो स्वतःच घर घेतो आणि आनंदाने त्या घरात तो राहायला लागतो. मग हळू हळू तो काटकसर करायला लागतो, खर्चांवर नियंत्रण कसे मिळवता येईल याचा विचार करतो, अवास्तव खर्च आटोक्यात येतात आणि मग हप्त्यासाठी जुळवा जुळव सुरू होते आणि मग मनात विचार करतो उगाच आगाऊपणा केला आणि घर घेतलं.

मुळात घर घ्याव का?
हो घर घेण हे जीवनावश्यक नसले तरी महत्वाचे आहे. किती दिवस सारखे घर बदलणार, किती दिवस भाडे भरत राहणार आणि मग आजूबाजूचे आणि नातेवाईक आहेतच की जे सारखे विचारात असतात की घेतलं का घर, त्यांना रोज कोण उत्तर देणार या सर्व कारणांमुळे घर घ्यायलाच हवे.
घर घेतांना कुठल्या गोष्टींचा विचार करावा? केवळ घरातल्यांच्या अपेक्षेपोटी, समाजाच्या दबावात येऊन आणि मित्र परीवाराचा हेवा करून व्यावहारीक विचार न करता केवळ भावनिक विचार करून घर मुळीच घेऊ नये. घर घेतांना काही गोष्टींचा कसून विचार केला गेला पाहिजे. याची दोन विभागात वर्गवारी केली पाहिजे. मुळात तुम्ही व्यवसाय करताय कीनोकरी. व्यवसाय करत असाल तर सर्व खर्च वगळता मासिक उत्पन्न किती मिळते ते बघा. त्यात तुमच्यावर अबलंबून असणारे सदस्य किती आहेत ते लक्षात घ्या आणखी काही उत्पन्नाचे साधने आहेत का?, घरात आणखी कोणी कमविणारे आहे का? नोकरी करत असाल तर नोकरीचे स्वरूप हे खाजगी आहे कि सरकारी ते पहा. खाजगी असेल तर तुम्ही कायम स्वरूपी आहात की कंत्राटी ते बघा. घर घेतांना या सर्वांचा विचार करणे गरजेचे आहे. एकूणच काय तर तुमचे उत्पन्न, अवलंबून असणार्‍या सदस्यांची संख्या, घरात कोणी आजारी असेल तर त्याचा वैद्यकीय खर्च, समोर कालांतराने येणारा मुलांचा शिक्षणाचा खर्च, लग्नकार्य, अकस्मात वैद्यकीय खर्च या सगळ्यांचा विचार करूनच तुम्ही घर घेण्याचा विचार केला पाहिजे.



भावनिक नव्हे व्यावहारीक विचार करून घ्यावे घर
किती कर्ज तुम्ही उचलणार आहात, त्याचा मासिक हफ्ता किती येईल, त्यावर किती टक्केवारीने व्याज आहे, व्याज हे सरासरी आही की कमी होत जाणारे हे देखील तपासा. कुठल्या संस्थेकडून तुम्ही कर्ज घेताय, राष्ट्रीयकृत बँकांनकडून शक्यतो कर्ज घ्यावे, खाजगी वित्तीय बँकां किंवा कंपन्यांकडून कर्ज घेतल्यास त्यांचे व्याजदर हे अगोदर कमी असतात नंतर ते वाढवू शकतात त्याची देखील काळजी घ्यावी. ज्यांचे सरासरी मासिक उत्पन्न हे सर्व खर्च वजा करून देखील निम्मे शिल्लक आहे त्यानेच घर घेण्याचा अट्टाहास करावा अन्यथा महिन्याला चार पाच हजार घरभाडे भरल्यास तुम्ही काही तोट्यात नाही तर फायद्यातच आहात हा विचार करा. समजा तुम्ही एखादे घर विकत घेतले ज्याची किमत 20 लाख आहे आणि तुम्ही परत फेड ही जर 20 वर्षांसाठी ठेवली तर 8 टक्के दराने तुम्हाला महिन्याला 16 हजार 729 रुपयांचा हप्ता येतो. म्हणजे केवळ व्याजापोटी तुम्ही 20 वर्षांमध्ये जवळ जवळ 20 लाख 14 हजार 912 इतकी रक्कम भरणार आहात आणि एकूण 40 लाख 14 हजार 960 एवढी रक्कम तुम्ही बँकेला परत कराल. एवढे करूनही तुम्ही ज्या इमारतीत हे घर घेतले आहे तिथला महिन्याचा मेंटेनन्स हा सोसायटीने ठरवून दिल्या प्रमाणे तो वेगळा भरावा लागेल तसेच इमारतीचे 25 वर्षानंतर ऑडिट होईल आणि काही वर्षांनी ती इमारत नूतनीकरणासाठी तुम्हाला खाली करावी लागेल. याउलट मी सर्व रक्कम कर्जापोटी न उचलता निदान 30 टक्क तरी माझी स्वतःची जमा राशी घर घेतांना दिली तर तुम्हाला केवळ 70 टक्केच कर्ज उचलावे लागेल आणि वर्षाकाठी इतर साधनांपासून मिळालेले उत्पन्न, वार्षिक बोनस हा घरात न खर्च करता एकदम जर कर्जाच्या रकमेत भरला तर तुमची मुद्दल रक्कम कमी होऊन परतफेडीचा कालावधी कमी करता येईल आणि लवकर तुम्ही कर्ज मुक्त व्हाल आणि स्वतःची काहीही जमा राशी किंवा शिल्लक नसेल तर थोडे थांबा आणि शिल्लक जमा करूनच घर घेण्याचा निर्णय घ्या. स्वप्न पूर्ण करा पण भावनिक विचार करून नव्हे तर व्यावहारीक विचार करून.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !